Monday, January 26, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २६ जानेवारी २०२६ - प्रजेची मूलभूत जबाबदारी

संपादकीय : २६ जानेवारी २०२६ – प्रजेची मूलभूत जबाबदारी

आज आपल्या देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिवस. दरवर्षी हा दिवस समाज उत्साहात साजरा करतो. करायलाही पाहिजे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असा देशाचा जगात लौकिक आहे. तिसर्‍या जगातील सुमारे १३५ देशांमध्ये फक्त भारतात लोकशाही टिकून तर आहेच पण भारताचे प्रजासत्ताक दिवसेंदिवस प्रगल्भही होत चालले आहे. १९५० साली राज्यघटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाली. जो लोकशाहीचा पाया आहे. न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुता अशा तत्वांनी घटनेने समाजाला एकसंघ ठेवले आहे.

- Advertisement -

प्रजासत्ताकच्या या संपन्न प्रवासात न्यायव्यवस्था, शासन-प्रशासन, अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, उद्योग-व्यवसाय यांची भूमिका मोलाची आहेच, पण यातील प्रजा या घटकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. घटनेने लोकांना त्यांचे हक्क बहाल केले. काही जबाबदार्‍या देखील सोपवल्या. निवडणूक हा लोकशाहीचा पाया. त्याअर्थाने लोकशाही टिकवून ठेवण्याची, ती प्रबळ करण्याची आणि सार्थ ठरवण्याची जबाबदारी घटनेने लोकांवर सोपवली आहे. मतदानाद्वारे लोक लोकशाहीत त्यांचा थेट सहभाग नोंदवतात. सामान्यतः दर पाच वर्षांनी येणार्‍या निवडणुकीत एक दिवस मतदान करून ती जबाबदारी पार पाडणे हा त्याचा वरकरणी अर्थ ठरू शकेल. लोक मतदानाचा मूलभूत अधिकार बजावून सरकार निवडून देतात. जे सरकार देशाच्या वाटचालीची दिशा म्हणजेच भविष्य ठरवते. तो अधिकार लोकांनी किती सुजाणपणे वापरायला हेच यावरून लक्षात येते. घटनेलाही तेच अपेक्षित आहे.

YouTube video player

तथापि या पातळीवर अनेकदा निराशा अनुभवास येते. नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका पार पडल्या. जे प्रभाग किंवा भाग तुलनेने अधिक सुशिक्षित मानले जातात तेथील मतदानाची टक्केवारी कमी आढळते. मतदानाची टक्केवारी दर निवडणुकीगणिक घसरतांना आढळते. विचारपूर्वक न केलेले एक मत चुकीच्या निवडीला सहाय्यभूत ठरू शकते. सरकार मतदानासाठी सुट्टी देते. त्या दिवसाचा उपयोग अनेक लोक सहलीला जाण्यासाठी करताना आढळतात. अनेक लोक क्षणीक प्रलोभनांना बळी पडतात. किती लोकांना लोकप्रतिनिधींच्या जबाबदार्‍या आणि कर्तव्ये वरकरणी तरी माहित असतात? नगरसेवक, आमदार आणि खासदार या पदांमधील फरक माहित असतो? आम्हाला राजकारणातील काही कळत नाही ही मानसिकता लोकशाही प्रबळ करू शकेल का? लोकांनी घटनेचा आणि राजकारणाचा किमान अभ्यास करणे घटनाकारांना देखील अपेक्षित असू शकेल.

समाज शहाणा होण्याचा प्रवास अभ्यासापासूनच सुरु होतो. लोकांनी राजकारणात रस घ्यायला हवा. राजकारण समजून घ्यायला हवे. तरच त्यांच्या एका मताचे महत्व लक्षात येईल. सामाजिक भान राखणे, नियम व कायद्यांचे पालन करणे हे लोकशाहीतील लोकांचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्याचा आदर किती लोक ठेवतात आणि ते आचरणात आणतात? उलटपक्षी नियम आणि कायदे मोडण्यासाठीच असतात असा भ्रम रुजत चालला आहे. नियम मोडण्याची वृत्ती सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणते. उदाहरणार्थ, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येचे ते एक प्रमुख कारण आहे. रस्ते अपघातांच्या बळींमध्ये तरुण पिढीचे प्रमाण चिंताजनक आहे. प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत ही उणीव आढळते. चलता है वृत्ती सामाजिक स्थैर्याला नख लावू शकते. भारताचे नाव जगात दुमदुमत आहे. भारताला सहभागी करून घेतल्याशिवाय अमेरिकेसारख्या अनेक प्रबळ देशांना त्यांच्याही देशातील राजकारण करणे अशक्य वाटू लागले आहे, व्यापारही त्यात आलाच. बहुसंख्य देश भारताशी विविध प्रकारचे करार करण्यास उत्सुक आहेत.

जागतिक स्तरावर देश अशी प्रगती तेव्हाच करू शकतो जेव्हा त्या देशातील जनता सुजाण असते आणि देशांतर्गत शांतता-सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य देते. आजच्या निमित्ताने दिल्लीस्थित कर्तव्यपथावरचे संचलन हा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मानले जाते. देशातील सगळी राज्ये त्यांची संस्कृती सादर करतात. प्रत्येक राज्य दुसर्‍यापेक्षा वेगळे. तरीही या दिवशी सर्वांचा मिळून एक रंग अवतरतो आणि तिरंगा ध्वजाला मानवंदना देतो. हीच विविधतेतील एकता भारतीय संस्कृतीचे एक प्रगल्भ प्रतीक आहे. प्रजासत्ताकमध्ये अंतर्भूत असणार्‍या प्रजेने तिची भूमिका समजून-उमजून पार पाडली तर ते प्रजासत्ताक चिरायू होईल हे नक्की. प्रजासत्ताक दिवसाच्या प्रजेला शुभेच्छा!

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘नियोजन’ च्या 756 कोटी 43 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 756 कोटी 43 लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे....