Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २६ जुलै २०२४ - कळते पण वळणार कधी?

संपादकीय : २६ जुलै २०२४ – कळते पण वळणार कधी?

एखाद्या शिकारीच्या मागे वेगाने धावताना बिबट्या विहिरीत पडण्याच्या घटना नेहमीच घडतात. त्याची सुटका करावी लागते. प्राणीच तो, त्याला काय कळते, अशीच बघ्यांची प्रतिक्रिया असते. पण अशी भावना व्यक्त करणारी माणसे जेव्हा पावसाळी पर्यटनस्थळी अनाठायी जीव धोक्यात घालतात त्याचे काय?

एखाद्या ठिकाणी माणसांनी प्रचंड गर्दी केल्याची छायाचित्रे अधूनमधून प्रसिद्ध होतात. त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन माणसांचा जीव जाईल की काय अशी भीती वाटावी अशीच ती परिस्थिती असते. अतिउत्साह जीवावर बेतल्याच्या घटना दरवर्षी घडतात. त्यांच्या संख्येत वाढच होताना आढळते. निसर्गातील अनेक वाटा अनवट असतात. सगळीच ठिकाणे माणसांसाठी सोयीची नसतात. त्यात अनेक धबधबे, धरणांचे पाणी साठवण, डोंगरदर्‍या यांचा समावेश असतो.

- Advertisement -

माणसे तिथेही पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि जीव धोक्यात घालतात. म्हणजे करणी माणसांची आणि ठिकाणेच बदनाम होताना आढळतात. अशा अनेक ठिकाणांवर सरकारने यावर्षीदेखील बंदी घातली. बंदोबस्तही ठेवला. पण माणसे त्या बंदीची ऐशीतैशी करतात. मुंबईतील एका धबधब्यावर बंदोबस्त होता. तथापि सुमारे पन्नास पर्यटकांच्या एका गटाने पोलिसांचा डोळा चुकवून धबधबा गाठला खरा, पण पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने ते अडकले. आपत्कालीन यंत्रणा, पोलीस आणि अग्निशमन दल यांच्या जवानांनी त्यांची सुटका केल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले.

आता सरकारने अजून काय करावे अशी लोकांची अपेक्षा असावी? बंदी घातली. बंदोबस्त ठेवला तरीही लोकांचा वेडेपणा सुरूच आढळतो. अशा अतिउत्साही लोकांसाठी बचाव पथकांनी नेहमीच त्यांचा जीव धोक्यात का घालावा? घटना कुठेही घडली तरी पथके धाव घेतात. रात्रंदिवस काम करतात. अत्यंत धोकादायक ठिकाणीही माणसे जातात असे त्यांचे निरीक्षण असते. प्रशिक्षण घेतलेले असले तरी पथकातही माणसेच असतात. तीदेखील त्यांच्या कुटुंबातील कर्ते असतात. त्यांचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असते.

दुर्दैवाने अपघात त्यांच्याही बाबतीत घडण्याचा धोका नाकारला जाऊ शकेल का? अतिउत्साही लोकांच्या वेडेपणाचा ठेका त्यांनी का घ्यावा? असे प्रश्न लोकांना पडतच नसावेत का? बंदी घातल्याचा अर्थ त्यांना खरेच समजत नसेल का? माणसांची बुद्धी माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे करते. त्या बुद्धीचा वापर माणसांनी करण्याची जाणत्यांना अपेक्षा आहे. काही होत नाही.. या भावनेचा त्याग करावा, बुद्धीचा वापर करावा, बंदी आणि बंदोबस्तामागचा उद्देश समजवून घ्यावा, अनाठायी धाडस टाळावेच, इतरांनाही टाळण्यास प्रवृत्त करावे, अशी अपेक्षा करावी का?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...