Saturday, November 23, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : २६ जून २०२४ - दिलासा असला तरी टाळलेले बरे

संपादकीय : २६ जून २०२४ – दिलासा असला तरी टाळलेले बरे

जागतिक स्तरावर भारत कॅन्सरची राजधानी मानला जातो. 2025 पर्यंत भारतात कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढलेले असेल असा निष्कर्ष नमूद असणारे अहवाल अधूनमधून प्रसिद्ध होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर ही सामान्य बाब आहे. कॅन्सर दीर्घकालीन आणि खर्चिक व्याधी आहे.

कॅन्सरचे निदान झालेली व्यक्ती आधी मनाने कोलमडते आणि नंतर खर्चिक उपचारांच्या ओझ्याने तिचे व कुटुंबियांचे कंबरडे मोडते. अनेक व्यक्तींच्या बाबतीत कॅन्सरचा संसर्ग झाल्याचे उशिरा लक्षात येते. निदान होईपर्यंत त्यांचा कॅन्सर प्रगत झालेला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांना आढळते. अशा व्यक्तींचा उपचाराचा खर्च प्राथमिक अवस्थेतील उपचारांच्या तुलनेत सुमारे पंचेचाळीस टक्क्यांनी जास्त असतो असा निष्कर्ष टाटा मेमोरियलने काढला आहे.

- Advertisement -

याविषयी वृत्त माध्यमांत नुकतेच प्रसिद्ध झाले. दिवसेंदिवस वैद्यकीय उपचार कमालीचे महागडे होत आहेत. त्याला कॅन्सर व्याधी अपवाद नाही. किमोथेरपी आणि रेडिओथेरपी हा उपचारांचा भाग आहे. कॅन्सर रुग्णांना किमोच्या विविध दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. जसे की, केस गळणे, त्वचेवर चट्टे पडणे किंवा पुरळ येणे, तोंडाची चव जाणे, उष्णता निर्माण होणे हे त्यापैकीच काही दुष्परिणाम. याच दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारे औषध उपलब्ध झाल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.

अणुऊर्जा विभाग, भाभा अणू संशोधन केंद्र, टाटा रुग्णालय यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हे औषध बनवण्यात आल्याचे आणि या औषधाची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशीच आहे, असेही त्या वृत्तात म्हटले आहे. कॅन्सरवर उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक प्रयत्न करतात. सामाजिक संस्थांना भेटी देतात. सरकारी कार्यालयात खेट्या मारतात. खर्चाच्या तुलनेत फूल ना फुलाची पाकळी जरी मिळाली तरी लोकांना दिलासा मिळू शकेल. हे झाले उपचारांसंदर्भातले.

कॅन्सरचे निदान झाल्यावर उपचारांशिवाय दुसरा मार्ग नसतो. तथापि तो होऊ नये म्हणून दक्षता बाळगण्याचे काम नक्कीच माणसे त्यांच्या पातळीवरदेखील करू शकतात. कॅन्सर का होऊ शकतो हे एकदा समजावून घेतले तर तो टाळायचा कसा याचे मार्ग सापडू शकतात. किमान आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा स्वीकार माणसांना अनेक व्याधींपासून दूर ठेवू शकेल. त्यात आहार-विहार आणि थोडासा व्यायाम याचा समावेश आहे. उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा हे तत्त्व अंमलात आणायचे की बेबंद दिनचर्या अंगिकारून व्याधी आणि त्यांच्या उपचारांचा खर्च माथी मारून घ्यायचा याचा निर्णय लोकांनी करायचा आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या