Friday, September 20, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २७ ऑगस्ट २०२४ - वैचारिक वारशाचा पायंडा

संपादकीय : २७ ऑगस्ट २०२४ – वैचारिक वारशाचा पायंडा

लोकांचा सहभाग लोकशाही सार्थ ठरवतो. लोकांचा सहभाग फक्त मतदानापुरता मर्यादित राहू नये, अशी जाणत्यांची अपेक्षा असते. त्यासाठी सामाजिक संस्थाही सातत्याने प्रयत्नशील असतात. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी लोकांनी सहभाग घेतला तर समस्या लवकर सुटू शकतात.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात उमराणे येथील जाणता राजा मित्रमंडळाने लोकसहभागातून तीन किलोमीटरचा रस्ता नुकताच दुरुस्त केला. हा रस्ता गेली अनेक वर्षे नादुरुस्त होता असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. ग्रामस्थांची गैरसोय होत होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा रस्ता दुरुस्त झाला असून, लोकांची सोय झाली आहे. शूरवीर रायबा तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ मंडळाने हा उपक्रम राबवला.

सार्वजनिक मंडळांच्या निमित्ताने शेकडो लोक एकत्र येतात. मंडळाचे काम पुढे नेतात. वार्षिक उत्सव साजरे करतात. ते त्यांनी करावेतच. तथापि लोकसंघटनातून समाजकार्य हे देखील मंडळांचा एक उद्देश असतो. त्याची आठवण उपरोक्त मंडळाने करून दिली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दिवस सार्वजनिक सणसमारंभाचे आहेत. अनेक सार्वजनिक गणेशोस्तव मंडळे समाजकार्यासाठी ओळखली जातात.

नैसर्गिक आपत्तीत जनतेला मदतीचा हात देण्यात, शैक्षणिक मदत करण्यात अनेक मंडळे आघाडीवर असतात. यंदाही ती परंपरा पुढे सुरूच राहील अशी लोकांची अपेक्षा असेल. अशी मंडळे त्यांच्या कामातून छोट्या मंडळांना प्रोत्साहित करतात. त्यांनी समाजहितासाठी फुल ना फुलाची पाकळी तरी अर्पण करावी यासाठी पाऊलवाट निर्माण करतात. तोच वारसा उमराणेस्थित मंडळाने पुढे चालवला आहे.

या मंडळाने रायबा तानाजी मालुसरे यांच्या स्मृती तर जागवल्याच पण त्यांचा वैचारिक वारसाही अंमलात आणला. ज्याचा आदर्श समाजही घेऊ शकेल. राष्ट्रपुरुष आणि असंख्य समाजसुधारकांनी समाजासाठी त्यांचे आयुष्य वेचले. भेदाभेदावर सातत्याने प्रहार केला. लोकांनी सगळे भेद विसरून समाजासाठी एकत्र यावे यासाठी काम केले. शैक्षणिक चळवळ उभी केली. समाजाला प्रगतीशील विचारांचा आणि समाजहितैषी मूल्यांचा वारसा दिला.

‘आधी केले मग सांगितले’ असेच त्यांचे विचार आणि आचार होता. ज्यांचे पालन समाजाने करण्याची कधी नव्हे इतकी गरज आजघडीला आहे. त्यातील मर्म उमराण्याच्या मित्रमंडळाने ओळखले असावे. तानाजी मालुसरे आणि रायबा मालुसरेंनी घालून दिलेला समाजसेवेचा वसा स्वीकारून त्यांच्या स्मृती जपल्या आहेत. तोच आदर्श घेण्याची गरज आहे. त्यांनी घालून दिलेल्या पायंड्याचे समाज स्वागत करेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या