Thursday, February 5, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २७ जून २०२५ - अपेक्षांचे जड झाले ओझे…

संपादकीय : २७ जून २०२५ – अपेक्षांचे जड झाले ओझे…

दप्तराचे ओझे सहज पेलणार्‍या मुलांना पालकांच्या अपेक्षांचे ओझे मात्र पेलवेनासे होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही खोलवर मुरलेली समस्या झाली आहे. तिची पाळेमुळे खेडोपाडी पसरली आहेत. सांगली जिल्हा आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात नुकतीच अशी घटना घडली. खासगी शिकवणीच्या ठिकाणी घेतलेल्या मनीटफच्या सराव परीक्षेत मुलीने मनासारखे गुण मिळवले नाहीत. याचा राग येऊन तिच्या वडिलांनी तिला इतके बेदम मारले की, त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला.

यातील विदारकता अशी… मुलीचे वडील मुख्याध्यापक तर आई सरपंच आहे. तरीही तिची सराव परीक्षा होती आणि विशेष गुण मिळवण्याची संधी तिच्याकडे होती हेही त्यांच्या लक्षात येऊ नये? उच्चशिक्षित पालकांनाही मुलांचे मन समजत नसेल तर त्या मुलांनी काय करावे? मुलीची क्षमता, तिच्या मनाचा कल, तिची अभिरुची, कौशल्ये, तिला त्या क्षेत्राची आवड आहे? असे कोणतेही प्रश्न त्यांनाच नव्हे तर इतर पालकांनाही पडू नयेत? मुलांच्या भविष्याची दिशा निश्चित करताना मुलांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न बहुसंख्य पालक करीत नाहीत. उलट मुलांनी फक्त भरपूर गुण मिळवावेत, असेच मुलांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. त्याअर्थाने मुलांना गुणांचे यंत्र बनवत आहोत, याची जाणीव अभावानेच आढळते.

- Advertisement -

शिक्षणाचा मूळ हेतू हरवला की, अशी जीवघेणी गुंतागुंत निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक विकास करते आणि त्यांना माणूस बनवते ते शिक्षण, अशी शिक्षणाची ढोबळ व्याख्या होऊ शकेल. किती पालकांना मुलांच्या अशा समग्र विकासात रस असतो? दुसरीकडे ठोस शैक्षणिक धोरणाचा सार्वकालिक अभाव आहे. पुस्तके, गणवेश, परीक्षा, पोषण आहार यात सातत्याने बदल केला जातो. त्याचाही ताण येतोच. समाजातील अनेक मुलांचा विशिष्ट दिशेने कल आढळतो म्हणून त्यांच्याही मुलांनी त्याच दिशेने जावे, असा बहुसंख्य पालकांचा आग्रह असतो. त्यासाठी ते पाण्यासारखा पैसा खर्च करण्यास तयार असतात.

YouTube video player

मुलांनी फक्त त्यांचे स्वप्न पूर्ण करावे हाच हेतू असतो. त्यांचा हाच अट्टाहास मुलांची मेंढरे बनवतो. डोळ्यांना पालकांच्या अपेक्षांची झापडे लावलेली मुले पालकांनी ठरवलेल्या मार्गावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. तथापि वर उल्लेखित मुलीसारखे थकले-भागलेले अनेक कोवळे जीव त्यांच्याही नकळत आत्महत्या करतात. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही जटील समस्या बनत आहे. पालक मुलांना त्यांच्या काळजाचा तुकडा मानतात. तसे वारंवार बोलूनही दाखवतात, पण याच मुलांना आयुष्यात काय बनायला आवडेल यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज शिक्षित पालकांनाही वाटत नाही. किंबहुना, मुलांना काय कळते, असा भ्रम असतो. त्यांचा हाच भ्रम मुलांचे बालपण हिरावून घेतो. त्यातून अडनिड्या वयातील अकाली पानगळ मात्र सुरूच राहते.

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...