Friday, November 22, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २८ ऑगस्ट २०२४ - वैचारिक कृतिशीलतेची जोड आवश्यक

संपादकीय : २८ ऑगस्ट २०२४ – वैचारिक कृतिशीलतेची जोड आवश्यक

सामाजिक सुधारणा आणि त्यांची गरज हा कालातीत मुद्दा आहे. उदाहरणार्थ शारीरिक अत्याचाराचे गुन्हे आणि त्याकडे बघण्याची समाजाची धारणा. अशा काही मुद्यांवर सातत्याने बोलले जाणे आणि समाजाचे लक्ष वेधून घेणे ही त्या-त्यावेळेची नितांत गरज असते. ते कर्तव्य पार पाडणे हे जाणते आणि माध्यमांचे कर्तव्य असते. हे दोन्ही घटक वेळोवेळी ती जबाबदारी पार पाडतात.

विकृत मानसिकतेतून घडलेले कर्नाटक, बदलापूर आणि त्याच काळात त्याच धर्तीच्या उघडकीस आलेल्या अनेक प्रकरणांमुळे माणसे, विशेषतः मुलींचे पालक मुळापासून हादरले. मुलींना घराबाहेर पाठवायचे आणि शिकवायचे नाही का, असा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण झाला असावा. अनेकांच्या संतापाचा उद्रेकही झाला. ते रस्त्यावर उतरले. सरकारला या प्रकरणांची दखल घेण्यास त्यांनी भाग पाडले, असेही म्हटले जाऊ शकेल. अशा काही घटना घडल्या की, राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा नेहमीच रंगतो. निदान सुजाण आणि जाणते पालक तरी राजकीय वादंग नक्कीच बाजूला ठेवतात किंवा ठेवतील याविषयी जाणत्यांच्या मनात अजिबात शंका नसेल.

- Advertisement -

शारीरिक अत्याचाराच्या घटना एकापाठोपाठ उघडकीस आल्या म्हणूनच नव्हे तर एकूणच सामाजिक असुरक्षिततेमुळे मुलींचे पालक नेहमीच धास्तावलेले आढळतात. मुलींच्या पालकांनी अस्वस्थ व्हावे अशी परिस्थिती आहे हे खरे. तथापि अनेक पालक त्या अस्वस्थतेला निरंतर कृतिशीलतेची जोड देताना आढळतात. अपत्यांचे संगोपन डोळसपणे करताना आढळतात. त्यांच्यावर योग्य वयात योग्य संस्कार करण्याची दक्षता घेतात. ते त्यांना कसे शक्य होते त्यावरही मंथन होणे आवश्यक आहे.

अपत्यांचे म्हणजे मुलगा आणि मुलीचे संगोपन कसे करावे? त्यांच्यात मूल्ये कशी रुजवावीत? अनुचित घटनांचा किंवा वातावरणाचा सामना कसा करावा? अशा घटना कशा टाळल्या जाऊ शकतात? त्यांच्याशी संवाद कसा ठेवावा आणि त्यात सातत्य कसे राखावे? अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणारे लिखाण तज्ज्ञ सध्या करत आहेत. माध्यमेही तज्ज्ञांना आमंत्रित करून चर्चा घडवत आहेत. या व्यासपीठांवरून तज्ज्ञ सल्ले देतात. पालकांच्या पातळीवर योजले जाऊ शकतील असे उपाय सुचवतात. मुलांना त्यांच्या पालकांशिवाय अन्य कोण अंतर्बाह्य ओळखू शकेल? मुलांमधील वर्तनदोष पालकांच्या लक्षात येऊ शकतात. त्यांची दखल वेळीच घेतली गेली तर वर्तनदोष घालवला जाऊ शकतो. मुलांवरील डोळस प्रेम त्यांचा विकास घडवू शकते. तथापि वर्तनदोष मानसिक विकारात रूपांतरित होण्याला त्यांच्यावरील अंध प्रेम प्रोत्साहन ठरू शकेल. याकडे तज्ज्ञ लक्ष वेधून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करतात.

जसे की, तो किंवा ती पहिल्यापासूनच सनकी आहे, संतापी आहे, काय करेल याचा भरवसा नाही अशी भलामण अनेक पालक करताना आढळतात. ते योग्य नव्हे. अनेक पालकांनी धरणे धरले. रास्ता रोको केला. मुलींना स्वसंरक्षण शिकवणारे वर्ग सामाजिक संस्थांनी सुरू केले. सरकारी पातळीवर तातडीने विविध निर्णय घेतले गेले. शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या. ते योग्यच म्हणावे लागेल. पण ते झाले तात्पुरते उपाय.

सामाजिक वातावरण सर्वार्थाने सुरक्षित करायचे तर परिस्थितीचे चिंतन, मनन, तज्ज्ञांनी सुचवलेले उपाय अमलात आणणे, मुलांवर योग्य संस्कार करणे आणि त्यांच्यात मूल्ये रुजवणे याला पर्याय नाही यावर मात्र सर्व तज्ज्ञांचे एकमत आढळते. ते सरकारने आणि विशेषतः पालकांनी गंभीरपणे घ्यायला हवे. कोणत्याही अनुचित घटना घडल्या की त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात समाजातील सर्वच घटकांनी वैचारिक परिपक्वता दाखवावी, अशी जाणत्यांची अपेक्षा असते. तथापि ती तशी अभावानेच दिसते, ही खंत व्यक्त करतात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या