Saturday, February 28, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २८ फेब्रुवारी २०२६ - आव्हान आहेच; पण क्षमताही!

संपादकीय : २८ फेब्रुवारी २०२६ – आव्हान आहेच; पण क्षमताही!

राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. हे दोन्ही निर्णय लोकांना अपेक्षितच होते. सुनेत्राताईंच्या पाठी राजकारणाचा माहेर आणि सासरचा वारसा आहे. सामान्य कार्यकर्त्यांचादेखील त्यांना पाठिंबा असल्याचे चित्र आहे. तथापि, त्यांच्या पक्षातील आणि इतरही अनेक राजकीय धुरंधर मात्र ताई सक्रिय राजकारणात नवख्या असल्याचे मानतात. कुरापती काढण्यातही असे धुरंधर माहिर असतात. मात्र, अजित पवार यांच्याइतक्याच खमकेपणाने राज्य आणि पक्ष दोन्ही सांभाळू शकतो हे सुनेत्राताईंना सिद्ध करावे लागणार आहे आणि तेच मोठे आव्हान असू शकेल. त्याची चुणूक पत्रकार परिषदेने त्यांना दाखवून दिली असावी.

- Advertisement -

राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीनंतर त्यांची पहिलीच पत्रकार परिषद झाली. अध्यक्ष म्हणून त्या संवाद साधतील ही माध्यमांची अपेक्षा पुरती फोल ठरली. त्यांच्या संवादाशिवायच पत्रकार परिषद संपवली गेली. ताईंची मन:स्थिती ठीक नाही असे माध्यम प्रतिनिधींना सांगितले जात होते असे माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी त्यांना बोलू दिले नाही, असाही याचा एक अर्थ काढला गेला. आमदार सरोज आहिरे यांचा दावा त्या अर्थाची पुष्टी करणारा ठरू शकेल. कार्यकर्त्यांना अजित पवारांपासून दूर ठेवले जात होते. सुनेत्राताईंच्या काळात तरी असे घडू नये, अशा भावना त्यांनी माध्यमांकडे व्यक्त केल्या.

YouTube video player

भविष्यात असे अनेक दावे-प्रतिदावे, कुरघोड्या आणि एकमेकांची उणीदुणी ताईंसमोर येतील. त्यातील राजकारण ओळखून वागण्याचे कसब त्यांना दाखवावे लागेल. अजित पवार यांच्या धक्कादायक निधनानंतर पक्षावर ताबा मिळवण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमधील अनेकांच्या महत्त्वाकांक्षांना पंख फुटलेले जनतेने पाहिले. अनेकांचे तसे प्रयत्न जनतेपासून लपून राहिलेले नव्हते. अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर पहिल्या काही तासांतच पडद्यामागच्या हालचालींनी कमालीचा वेग घेतल्याचे नंतर जनतेसमोर आले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या संभाव्य अध्यक्षपदाच्या नावाची एक शक्यता व्यक्त केली म्हणून खुलासा करण्याची वेळ भाजपचे ज्येष्ठ नेते पीयूष गोयल यांच्यावर आली होती. आता ती सूत्रे ताईंकडे सोपवली गेली आहेत. तेव्हा त्यांच्या राजकारणातील नवखेपणाचा बाऊ करून पक्षावर नियंत्रण मिळवण्याची महत्त्वाकांक्षा काहीअंशी तरी साध्य केली जाऊ शकेल अशा हालचाली पक्षांतर्गत यापुढेही होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकणार नाही.

पती निधनाचा प्रसंग ताईंनी धीरोदात्तपणे हाताळला याबद्दल कार्यकर्ते कौतुकाने बोलतात. अजित पवार हयात असेपर्यंत त्यांची प्रतिष्ठा ताईंनी सांभाळलीच. तो अनुभव पक्षाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा सांभाळण्यासाठी त्यांना उपयोगी पडू शकेल. पत्रकार परिषदेतदेखील ताई काहीच का बोलल्या नाहीत, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असू शकेल. पण, राजकारणात सदा सर्वकाळ ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’ ठरत नाही आणि प्रसंगी मौनही पुरेसे बोलके मानले जाते हे त्यांनाही हळूहळू कळेल. अजित पवार यांच्या अपघाताचे राजकारण करू नये असे आवाहन खुद्द शरद पवार यांनी केले होते. पण त्यांचा तो सल्ला कुटुंबीयांनीच मानलेला नाही. तिथेही दुफळी आढळते. अजित पवार यांचा अपघात की घातपात, यावरून घमासान सुरू आहे. त्याविषयी सुरू असलेल्या दाव्यांमुळे कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रमावस्था असणे स्वाभाविकच.

जय आणि पार्थ ही त्यांची दोन मुले. त्यांना राजकारणात स्थिर करायचे कामदेखील बहुधा ताईंनाच पार पाडावे लागेल. पार्थ पवार यांची कंपनी वादाच्या भोवर्‍यात आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. असे संशयाचे धुके कुटुंबातील सदस्यांचा कायमच पाठलाग करते. राजकारणात जे दिसते ते सगळेच खरे नसते असे म्हटले जाते. त्यातील मतितार्थ त्यांच्या लक्षात एव्हाना आला असू शकेल. दोन्ही महत्त्वाची पदे संभाळताना ताईंसमोर अशी अनेक आव्हाने आहेत. आगामी काळात संबंधित सर्वांना बरोबर घेऊन चालावे लागेल. महिला राजकारणी नेत्या म्हणून समर्थपणे जबाबदारी पार पाडतात. पक्षही चालवतात. सत्तापदे राखतात. सत्तेचे राजकारण करण्याचे कसब कमवतात असा इतिहास आहे. ताईदेखील सक्रिय राजकारणात यशस्वी ठरतील याची कार्यकर्त्यांना खात्री असेल.

ताज्या बातम्या

अविघटनशील प्लास्टिक फुलांवरील बंदी कठोर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यात नैसर्गिकरित्या अविघटनशील प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर आधीपासूनच बंदी आहे. ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय...