आज माघ शुद्ध दशमी. ब्रह्मगिरीच्या गर्भातून गोदावरी आजच्याच दिवशी अवतीर्ण झाली. माघ शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत गोदावरी जयंती उत्सव नाशिकमध्ये साजरा केला जात आहे. गोदावरी नाशिक जिल्ह्याची जीवनदायिनी. सर्वार्थाने तिचे महत्व सांगणार्या अनेक पुराणकथा प्रचलित आहेत. विविध पुराणांमध्ये अनेक श्लोक समाविष्ट आहेत. अभ्यासकांशी संवादातून ते माहित करून समजूनही घेतले जाऊ शकतात. पुढच्या वर्षी गोदातीरी सिंहस्थ भरणार आहे. तेव्हा भक्तीचा मेळा फुलेल. तसाही वर्षभर विविध तिथींना गोदेत स्नान करण्यासाठी भाविकांचा मेळा जमतोच. केवळ गोदावरीच नव्हे तर विविध नद्यांमध्ये स्नान केल्याने पापनाश होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांच्या भावनेचा समाज आदर करतोच. तथापि गोदा प्रदूषणाचे त्यातही कारणीभूत ठरणार्यांचे पाप कसे फिटेल हा खरा प्रश्न आहे.
आत्तापर्यंत अनेकवेळा गोदा प्रदूषण मुक्त करण्याच्या घोषणा झाल्या. आराखडे तयार केल्याचे अधूनमधून जाहीर केले जाते. त्या आराखड्यांना नमामि गोदा सारखी नामाभिधाने दिली जातात. पण पुढे काहीच घडत नाही. सरकारे-त्यांनी नेमलेले अधिकारी येतात आणि जातात. मंत्री भेट देतात तेव्हा तेव्हा या मुद्याशी संबंधित आदेश देतात. उदाहरणार्थ, प्रक्रिया न करता पाणी थेट नदीपात्रात सोडणार्यांवर धाडी टाकण्याचे आदेश तत्कालीन मंत्र्यांनी दिले होते. नवनियुक्त अधिकारी गोदाकाठची पाहणी करतात. अशा पाहण्या नाशिककरांना देखील आता सवयीच्या झाल्या असाव्यात. त्यानंतर मास्टर प्लॅन जाहीर होतात. खरे तर गोदाच नव्हे तर बहुसंख्य नद्या प्रदुषित का होतात हे आता सगळेच जाणून असतील. इतक्या वेळा पाहणी झाली आहे. नदीपात्रात मिसळले जाणारे मलजल आणि प्रदुषित जल हे त्याचे एक मुख्य कारण. त्र्यंबकेश्वरपासून गोदा नाशिक जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाईपर्यंत तिच्या पात्रात किती ठिकाणी मलजल आणि प्रदूषित जल मिसळते हेही अधिकारी आणि इतरेजन तर नक्की जाणून असतील.
गोदापात्रात अनेक ठिकाणी तरंगणारा फेस सर्वांनाच दिसतो. म्हणजे समस्या माहित आहे. तिच्यावरचे सखोल आणि प्रभावी उपाय माहित आहेत. उदाहरणार्थ, मलजल-सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची (एसटीपी) संख्या कालसुसंगत वाढवणे. तरीही गोदा मात्र स्वच्छ होत नाही. किंबहुना अधिकाधिक प्रदूषित होत चालली आहे. अर्थात उपरोक्त उल्लेखिलेल्या सर्वांचा कृतीमागचा उद्देश-हेतू प्रामाणिक असूही शकेल. सगळ्याच भेटी आव आणणार्या नसतीलही. पण तरीही गोदा प्रदूषण मुक्तीचे गाडे अडते कुठे हे गूढ कधी उलगडेल ते कदाचित गोदाही सांगू शकणार नाही. राजकीय-प्रशासकीय इच्छाशक्ती आणि सातत्य यांचा अभाव हे मुख्य कारण असल्याचे अभ्यासक सांगतात. त्यासाठी नाशिककर आंदोलने करतात. सामाजिक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते न्यायालयात जातात. न्यायालय आदेश देते. पण.. ..! गोदा किंवा कोणतीही नदी प्रदूषणमुक्त करणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. त्यासाठी सातत्याने काम करत राहणे आवश्यक आहे. पण सातत्य राखण्यासाठी काम सुरु तर व्हायला हवे ना. सिंहस्थ जवळ येत चालला आहे. तरीही गोदा प्रदूषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे निदान नाशिककरांना माहित नाही. कारण तसे जर सुरु झाले असते तर माध्यमात त्याचा गजर त्यांच्या अनुभवास आला असता.
अर्थात, गोदा प्रदूषित होण्यासाठी लोकांचीही बेफिकिरी तितकाच हातभार लावते हे लोकही नाकारू शकणार नाहीत. निर्माल्य सर्रास नदीत फेकले जाते. कचरा टाकला जातो. वाहने व कपडे धुतले जातात. गोदापात्र स्वच्छ करण्याच्या मोहिमा मात्र सातत्याने सुरु असतात. पण काही दिवसांनी परिस्थिती जैसे थेच आढळते. याला लोकांच्या सवयी जबाबदार नाहीत का? दुर्दैवाने राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर जी अनास्था सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि अभ्यासकांच्या अनुभवास येते तीच लोकांच्या बाबतीतही आढळते. नदी तिचे पात्र नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करते असे सांगितले जाते. तथापि माणसाचे हे पाप स्वच्छ करता करता गोदाही थकली असू शकेल का? म्हणूनच काळवंडलेले पाणी घेऊन ती गपगुमान वाहात असेल का? तेव्हा, सर्वांचीच ङ्गचलता है वृत्तीफ गोदेच्या मुळावर उठली आहे. सिंहस्थात कोट्यवधी लोक नाशिकला भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जातो. धर्ममार्तंडासह कोट्यवधी भाविकांना प्रदूषित गोदापात्रात डुबकी मारायला लावायची की कसे, हे ठरवणे शासनाची जबाबदारी आहे.




