आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. खेळात विजय आणि पराभव सुरूच असतो. तथापि पराभवातही जिंकणे कशाला म्हणतात हे अफगाणिस्तानच्या संघाने दाखवून दिले. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत या संघाचा पराभव झाला. त्याचे संपूर्ण क्रिकेट विश्वाला दुःख झाले असणार. वास्तविक प्रत्येक संघाचे प्रशंसक प्रेक्षक असतात. त्यांच्या पसंतीचा संघ जिंकला किंवा हारला की त्यांच्याकडून तशाच प्रतिक्रिया उमटतात. अफगाणिस्तानचा संघ मात्र याला अपवाद ठरला.
संपादकीय : २७ जून २०२४ – जलसंवर्धनाचा वारसाच पुढे चालवणे हिताचे
उपांत्य फेरीतील त्यांच्या पराभवाने तमाम प्रेक्षकांना दुःख झाले. या स्पर्धेत या देशाने एका सामन्यात जेव्हा बांगलादेशाचा पराभव केला तेव्हा इंग्लडचा माजी खेळाडू जोनाथनने अफगाणिस्तानच्या गुरबाजला खांद्यावर घेऊन मिरवले. वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ब्राव्होच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते आणि स्टेडियममधील सगळे प्रेक्षक तो विजय साजरा करत होते. याच स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या संघाला धूळ चारली. उपांत्य फेरीत धडक हेच त्यांच्यासाठी स्वप्नवत असावे. याच संघाच्या बाबतीत ही खिलाडूवृत्ती का अनुभवाला आली? प्रेक्षकांचे या संघावर इतके प्रेम का जडले? या संघाची कामगिरी म्हणजे आव्हानांवर मात करण्याची, संकटांना सामोरे जाण्याची आणि प्रतिकूलतेलाही अनुकूल बनवण्याची प्रेरणादायी गोष्ट आहे.
संपादकीय : २६ जून २०२४ – दिलासा असला तरी टाळलेले बरे
त्यांच्या क्रिकेट क्लबची स्थापनाच रेफूजी कॅम्पमध्ये झाली. त्यांच्या देशावर वर्षानुवर्षे अमेरिकेचे वर्चस्व होते. कालांतराने त्यांनी माघार घेतली. मग कट्टर तालिबानचे सरकार स्थापन झाले. त्यांनी सगळ्याच खेळांवर बंदी घातली पण नंतर क्रिकेट बंदीमुक्त केले. देशांतर्गत वातावरण अस्थिर, कमालीची गरिबी आणि अनाथपण या खेळाडूंच्या वाट्याला आले. त्यांनी हार मानली असती तरी ती समर्थनीयच ठरली असती. पण तसे घडले नाही. ते कोणत्याही प्रतिकूलतेसाठी रडत बसले नाही की दोषांचे रडगाणे लावले नाही. त्यांना संताप आला नसेल का? असहाय्य वाटले नसेल का? कधीच निराशा दाटून आलीच नसेल का? पण ते जीवतोड मेहनत घेऊन खेळातून त्याला प्रत्युत्तर देण्याचा सतत प्रयत्न करतात.
विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक सामना हा त्याची साक्ष आहे. त्यांची वाटचाल प्रेरणादायी आहे. लोकांना अनेक समस्या असतात. विद्यार्थ्यांना अपयशाचा, तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. अनेक जण निराश होतात आणि परिस्थितीला दोष देऊन हार मानतात. पण त्यावर मात करण्यासाठी लढत राहणे हाच एकमेव मार्ग आहे हे या संघातील खेळाडूंनी दाखवून दिले. मानवातील विजिगिषू वृत्तीचा परिचय करून दिला.
‘क्या हार मैं, क्या जीत मैं, किंचित नही भयभीत मैं, कर्तव्यपथ पर जो भी मिला, यह सही और वो भी सही, वरदान नही मागुंगा, हो कुछ पर हार नही मानूंगा’ असे अटलबिहारी वाजपेयी एका कवितेत म्हणतात. अफगाणिस्तानच्या खेळाडूंची आणि नागरिकांची तीच भावना असणार. कारण अफगाणी नागरिकांच्या आयुष्यात क्रिकेट हाच विरंगुळा आहे आणि त्यांच्या खेळाडूंनी त्यांना तो भरभरून दिला आहे.