Friday, September 20, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : २७ जून २०२४ - जलसंवर्धनाचा वारसाच पुढे चालवणे हिताचे

संपादकीय : २७ जून २०२४ – जलसंवर्धनाचा वारसाच पुढे चालवणे हिताचे

नाशिककरांवरचे पाणीटंचाईचे सावट तात्पुरते टळले आहे. काश्यपी धरणातील पाणी गंगापूर धरणात टाकण्यात आले आहे. गंगापूर धरणावरील ताण कमी करण्यासाठी किकवी धरण प्रस्तावित आहे. त्याला त्वरित परवानगी द्यावी अशी नाशिककर आणि राजकीय नेत्यांची जुनी मागणी आहे. 2026 मध्ये कुंभमेळा आहे. ते विचारात घेता किकवी धरणाला शासन मान्यता देईन अशी अपेक्षा.

- Advertisement -

तथापि तूर्तास तरी पाणीटंचाई टळली आहे. हंगामी पाऊस लहरी बनत आहे. यंदाचेच उदाहरण घेता येऊ शकेल. मान्सून वेळेत दाखल होईल आणि समाधानकारक पाऊस पडेल असे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सांगितले गेले. हवामान खात्यानेही तोच अंदाज व्यक्त केला होता. तथापि जूनचा अर्धा महिना संपत आला आहे आणि पावसाने आजपर्यंत तरी ओढ दिली असून मान्सूनने अजून राज्य व्यापले नाही असे सांगितले जाते. तथापि पावसाशिवाय पाण्याचा दुसरा कोणताही स्रोत अजून तरी उपलब्ध नाही.

अन्य मार्गाने पाणी उपलब्ध करण्याचे खात्रीशीर मार्ग अजून तरी दृष्टीपथात नाहीत. त्यामुळे पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचे धोरण सरकारने आखायला हवे आणि ते कठोरपणे अंमलातही आणले पाहिजे. अन्यथा योजना जाहीर आणि फाईलबंदही होतात. इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवणे सरकारने बंधनकारक केल्याचे सांगितले जाते. किती इमारतींवर तशी सोय आढळते? हे होणे गरजेचे. नाशिकसह राज्यातील विविध शहरे वेगाने वाढत आहेत. पावसाने सरासरी गाठली किंवा नाही गाठली तरी अनेक गावे आणि वाड्या वस्त्यांना पाणीटंचाई जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. त्यावर उपाय करणे हे जसे सरकारचे काम आहे तसेच ते जनतेचे देखील कर्तव्य आहे.

माणसे त्यांच्या कळत-नकळत पाण्याची प्रचंड उधळपट्टी करतात. पाईप लावून गाडी धुणे, नळ सुरूच ठेवून अनेक कामे करणे, बादलीभर पाण्याचा सडा मारणे, शिळे झाले म्हणून पाणी फेकून देणे अशा दैनंदिन जीवनातील अनेक सवयी त्याचे चपखल उदाहरण. त्या सवयी बदलाव्याच लागतील. पाणी जपून वापरावे लागेल. शक्य असेल तिथे ते वाचवावे लागेल. पाणी शिळे होते अशा पाण्याविषयीच्या अनेक भ्रामक समजुती बदलाव्या लागतील. आपल्या पुढच्या पिढीला विनासायास पाणी उपलब्ध व्हावे असे वाटत असेल तर त्याला तरणोपाय नाही. पाण्याच्या बेसुमार वापराऐवजी जल संवर्धनाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्यातच पिढ्यांपिढ्यांचे हित दडले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या