खड्ड्यात गेलेले रस्ते वाहनचालकांच्या पाचवीला नेहमीच पूजलेले असतात. लोकांनी कितीही बोंबाबोंब केली तरी खड्डे तातडीने बुजवले जात नाहीत. रस्त्यांवर खड्डे पडण्यास निसर्गाला, म्हणजे पावसाला जबाबदार धरले जाते. कामचुकारपणा कोणाचा आणि दोष मात्र निसर्गाचा? विकासाची स्वप्ने दाखवणार्या सत्ताधार्यांचा ‘स्वप्न प्रकल्प’ असलेला मुंबई-नागपूरदरम्यानचा ‘समृद्धी महामार्ग’सुद्धा आता खड्ड्यांना अपवाद राहिलेला नाही.
महामार्गाच्या आमने ते इगतपुरी या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच वाजत-गाजत झाले. त्याला अजून पंधरवडाही लोटलेला नाही; तोच या टप्प्यातही महामार्गाला खड्डे पडले. प्रसार माध्यमांनी या महामार्गावरील ‘खड्ड्यांची समृद्धी’ वाचक-दर्शकांसमोर आणली. ते पाहून सगळेच आवाक झाले. रस्ते अथवा मार्गांवरील खड्डयांबाबत संबंधित खात्याकडून बेफिकिरी दाखवली जाते. वेगवान म्हणवल्या जाणार्या समृद्धी महामार्गावर इतक्या लवकर खड्डे पडतील याची कोणीच कल्पना केलेली नसेल, पण खड्डे पडले हे खरे! त्याचा बराच गाजावाजा झाल्यावर महामार्गावरील खड्डे आणि त्याची मापे मोजली गेली. ‘खड्डे नगण्य’ असल्याचेही जाहीर केले गेले व ते तातडीने बुजवून वेळ मारून नेण्यात आली. खड्ड्यांमळे महामार्गाचे काही नुकसान झाले नसल्याचे संबंधित अधिकार्यांकडून ठासून सांगितले गेले.
खड्ड्यांनी रस्त्यांचे नव्हे तर वाहनचालक व त्यांच्या वाहनांचे नुकसान होते. अपघात घडतात. प्रसंगी ते जीवघेणे ठरतात. याचा सोयीस्कर विसर का पडावा? ही झाली मसमृद्धीफवरील खड्ड्ड्यांची बात! राज्यातील छोट्या गावांतील रस्त्यांपासून जिल्हा आणि राज्यमार्गांचे हेच दुखणे आहे. दर पावसाळ्यात बहुसंख्य रस्ते मखड्ड्यातफ जातात, ते कसे? अधून-मधून रस्ते दुरुस्ती केली जाते. फक्त रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची घातला जातो. तरीही रस्त्यांवरील खड्डे मजैसे थेफ का राहतात? दर्जेदार रस्ते बांधण्याच्या घोषणा केल्या जातात.
नव्या तंत्राने बांधलेले रस्ते अनेक वर्षे खराब होणार नाहीत, त्यांना खड्डे पडणार नाहीत, अशी ग्वाही दिली जाते. अनुभवाने माणसे शहाणी होतात, असे म्हणतात. मग सरकारी खात्यांतील अधिकार्यांचा वर्षानुवर्षांचा अनुभव दर्जेदार रस्ते बांधणीसाठी कामी का येत नाही? खड्डे हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण आहे. अपघातांत तरुणांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याबद्दल या खात्याचे केंद्रीय मंत्री वारंवार जाहीरपणे चिंता व्यक्त करतात. रस्त्यांची दुर्दशा होऊ नये, अपघात टाळावेत, असे सरकारला मनापासून वाटत असेल तर खड्डेमुक्त, दर्जेदार रस्ते राज्यातील आणि देशातील जनतेला मिळावेत. हाच त्यावरचा एकमेव उपाय असून त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.




