Saturday, July 6, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : २९ जून २०२४ - धीर सोडू नका

संपादकीय : २९ जून २०२४ – धीर सोडू नका

नीट परीक्षा घोटाळ्यावरून लोकसभेच्या संसदीय अधिवेशनात विरोधक आणि सरकार यांच्यात घमासान चर्चा झाली. या परीक्षेवरून विद्यार्थी आणि पालकांमध्येही संभ्रमावस्था आहे. परीक्षा कधी होईल? कशी होईल? पुन्हा पेपर फुटेल का? केलेला अभ्यास वाया जाईल का? असे अनेक प्रश्न त्यांना पडले असणार. यंदाच्या ‘नीट’चा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले होते.

- Advertisement -

केवळ नीटच नव्हे तर अगदी दहावी किंवा बारावीच्या परीक्षेचा ताण किंवा निकाल हेही मुलांच्या आत्महत्येचे एक कारण आढळते. तशी घटना घडणारी कुटुंबे उद्ध्वस्त होतात. बहुसंख्य पालकांची स्वप्ने मुलांवर केंद्रित असतात. मुले अकाली कायमची निघून जाण्याने त्यांच्या पालकांच्या वाट्याला फक्त आयुष्याला पुरून उरणारे दुःख येते. थोडेसे मनासारखे नाही झाले तर मुले निराशेच्या गर्तेत जातात. निराशा हाताळायला अनेकांना जमत नाही. कारण भावना कशा हाताळायच्या हे मुलांना शिकवलेच जात नाही. मुलांना ताण का येतो? ते निराशाग्रस्त का होतात? प्रसंगी आत्महत्येसारखेच पाऊल का उचलतात? कारण परीक्षा उत्तीर्ण होण्यालाच अधिक महत्त्व दिले जाताना आढळते.

अनुत्तीर्ण मुलांची समाज हेटाळणी करतो. त्यांना जगण्यालाच नालायक ठरवले जाताना आढळते. तथापि परीक्षा आणि त्याद्वारे केले जाणारे करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे. आयुष्यात यशस्वी होण्याला परीक्षा मदत करते पण ते म्हणजे सर्वस्व नव्हे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली जाणे गरजेचे आहे. मुलांचा शैक्षणिक काळ गुणांभोवती फिरतो. आयुष्य आनंदाने जगण्यासाठी शिक्षणाबरोबरच अनेक क्षमता आवश्यक असतात. आव्हानांवर मात करणे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणे, संवाद साधणे, प्रामाणिकता, प्रयत्नांवर दृढ विश्वास या त्यापैकीच काही. त्याची जाणीव मुलांना करून देणे आणि त्या त्यांच्या स्वभावात रुजवणे ही जबाबदारी पालक आणि शिक्षकांची आहे. मुलांना धीर धरण्यास शिकवले जायला हवे.

प्रत्येक मुलामध्ये काही ना काही वैशिष्ट्य, आवडीनिवडी असतात. त्याचा शोध घेण्यासाठी पालक त्यांना मदत करू शकतील. पालकांनी धीर सोडला नाही तर मुले सोडणार नाहीत. हे झाले पालकांचे. यापूर्वी अनेक वेळा पेपर फुटले आहेत. पण त्या चुकीतून यंत्रणेने कोणताही धडा घेतला नसावा. त्याशिवाय पेपरफुटीचा सिलसिला सुरू राहिला नसता. नीट घोटाळ्यानंतर पेपरफुटीविरुद्धचा कायदा लागू झाला आहे. दोषींना जबर आर्थिक दंड आणि शिक्षेची तरतूद केल्याचे जाहीर झाले आहे. उशिरा का होईना पण कायदा निर्माण करण्यात आला आहे. त्याची कठोर अंमलबजावणीही केली जाईल अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या