एकीकडे सगळा देश संविधान दिवस साजरा करत असताना गोपनीयता या मानवी मूलभूत हक्काची सर्रास पायमल्ली होताना आढळते. लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातील सामाजिक घुसखोरी वाढत चालली आहे. मग ती स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या विवाहातील असो अथवा स्व. धर्मेंद्र यांच्या बाबतीतील असो. वास्तविक विवाह हा दोन कुटुंबांमधील भावनिक आणि वैयक्तिक सोहळा. तो जमणे अथवा रद्द होणे हा त्या त्या कुटुंबांसाठी भावनिक निर्णय असतो.
कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू हा त्या कुटुंबातील लोकांना भावनिक कोलमडवून टाकणारा असतो. आयुष्याला पुरून उरणारे दुःख त्यांच्या पदराला बांधले जाते. त्याची पर्वा न करता त्याची लोकांनी चर्चा तरी किती करावी? त्यांच्या खासगी आयुष्याचे धिंडवडे तरी किती काढावेत? याच स्मृती मंधानाला काही दिवसांपूर्वी समाजाने डोयावर घेतले होते आणि धर्मेंद्र यांच्या चित्रपटांनी लोकांना वेड लावले होते, याचाही विसर लोकांना पडावा? महिलांचा विश्वचषक देशाच्या नावे करण्यात तिने मोलाची भूमिका बजावली, हेही लोक विसरले? की प्रभावशाली लोकांना खासगी आयुष्य असते, ते जगण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असतो, त्याची गोपनीयता जपण्याचा अधिकार त्यांना घटनेने बहाल केला आहे याचा लोकांना विसर पडला असावा का?
हीच घुसखोरी स्व. धर्मेंद्र यांच्याही बाबतीत संवेदनशील माणसांच्या अनुभवाला आली. अनारोग्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि घुसखोरांना जणू त्यांच्या आयुष्यात डोकावण्याचा परवानाच मिळाला असावा. ते हयात असतानाही त्यांच्या मृत्यूची बातमी अनेक वेळा पसरली किंवा पसरवली गेली. कोणाच्याही खासगी आयुष्याचा पंचनामा करू नये इतया साध्या विवेकाला लोकांनी तिलांजली दिली असावी का? केवळ बघ्यांची संख्या वाढावी म्हणून अशा गोष्टींचा फायदा घेण्याइतपत निर्ढावलेपण अनेकांमध्ये आले आहे.
स्मृती मंधाना, धर्मेंद्र किंवा असे अन्य कोणीही, यांच्या जागी आपले आप्तेष्ट किंवा कुटुंबातील सदस्य असते तर, अशी चर्चा आवडली असती का? हा विचार लोक का करत नसावेत? हाच प्रश्न प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनीदेखील जाहीररीत्या विचारला आहे. जरा आपले आपले बघूया, असा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे. समाजाला सांगण्यासारखे काही असेल तर ते समाजाला कळेलच इतकीही प्रतीक्षा लोक करेनासे का झाले असावेत? प्रभावशाली व्यक्तींचे आयुष्य म्हणजे सार्वजनिक कट्टा असा समज रुजला असावा. स्मृतीचा विवाह का मोडला किंवा का लांबवला किंवा धर्मेंद्र यांचे काही झाले का, हे सर्वात आधी कळाले असे दाखवण्याचा अट्टाहास आढळतो. असे करून काय साधले जात असावे? किंवा काय साध्य करायचे असावे? कोणाच्याही खासगी आयुष्यात किती डोकवावे याचे सामाजिक संकेत पूर्वसुरींनी घालून दिले आहेत. ते पुन्हा एकदा दृग्गोचर करण्याची आवश्यकता आहे.
समाज माध्यमांवर वेळ वाया घालवणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतात व्हॉटस्अॅप वापरकर्त्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे. एका आंतरराष्ट्रीय अहवालात हा निष्कर्ष नमूद असल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. यातील सगळेच लोक सघन मजकूर बघत असू शकतील का? लोक तासन्तास समाज माध्यमांवर असतात. वास्तविक समाज माध्यमांवरील प्रभावाचा विविध मार्गांनी समाजासाठी उपयोग केला जाऊ शकेल. अनेक सामाजिक कामांमध्ये लोकसहभागाची उणीव आढळते. केवळ सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठबळाअभावी अनेक सामाजिक कामे थांबलेली किंवा त्यांचा वेग कमी आढळतो. अनेक सामाजिक समस्यांवर चर्चा केली जाऊ शकेल.
समाज मन प्रगल्भ होण्याचा मार्ग त्यातून प्रशस्त करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतील. समाज माध्यमांवरदेखील असे अनेक प्रभावक आहेत. जे चांगला मजकूर बनवतात. संस्कृती, इतिहास, मूल्ये, समाजपुरुषांचा परिचय यांचा उहापोह करतात. नसती उठाठेव करणार्यांच्या तुलनेत अशा मजकुराची बघ्यांची संख्या कमीच आढळते. तेव्हा कोणती मूल्ये समाजात आणि युवा पिढीत रुजवायची, कोणत्या मजकुराला पाठबळ द्यायचे, विविध प्रकारच्या सामाजिक संकेतांचे महत्त्व कसे आणि का जपायचे याचा विचार करणे ही जाणत्यांची जबाबदारी आहे. अन्यथा सामाजिक घुसखोरीची वृत्ती वाढत जाण्याचा धोका नाकारला जाऊ शकत नाही. आज ती ख्यातनाम व्यक्तींच्या आयुष्यापुरती मर्यादित आढळते असे वाटत असले तरी तिची पाळेमुळे खोल रुजत जाणे अनेकार्थांनी परवडणारे नाही.




