अजितदादांच्या अकाली जाण्याने विमान प्रवास आणि प्रवाशांची सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अजितदादांच्या विमानाच्या अपघाताच्या अनेक शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अपघात टळू शकला असता का, यावरही मतमतांतरे व्यक्त होत आहेत. यापुढेही काही काळ होत राहतील. या अपघाताच्या चौकशीची मागणी स्वाभाविकच होती. तशी ती होणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. सध्याचा काळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मानला जातो. तरीही हवाई प्रवास सुरक्षित का वाटत नाही? हवाई प्रवासाचे नियंत्रण व नियोजन नागरी विमान वाहतूक महासंचालनालय करत नाही तर ते व्यावसायिक कंपन्यांच्या हातात गेल्याचे मत अनेक तज्ज्ञ खासगी चर्चांमध्ये व्यक्त करतात.
तांत्रिक आणि नियोजनातील त्रुटींच्या नावाखाली एका व्यावसायिक विमान कंपनीने हजारो प्रवाशांना वेठीला धरले होते. प्रवाशांची ससेहोलपट झाली होती. या मनमानीला फार काळ उलटलेला नाही आणि तसे का घडले हे अजूनही प्रवाशांना निश्चित कळू शकलेले नाही. छोटे विमान प्रवास, त्यातील संभाव्य धोके, अपघातांची सामान्य कारणे याविषयी माध्यमांमध्ये माहिती भरभरून वाहत आहे. छोट्या विमानाने प्रवास करत जाऊ नको, असा सल्ला अजितदादांनी दिल्याची आठवण राजवर्धन कदमबांडे यांनी माध्यमांना सांगितली. तरी छोट्या विमानाने प्रवास करणे ही राजकीय नेत्यांची अपरिहार्यता मानली जाऊ शकेल. दादांच्या निधनानंतर शरद पवारांसह अनेक नेत्यांनी छोट्याच विमानाने बारामती गाठली हे त्या अपरिहार्यतेचे चपखल उदाहरण ठरू शकेल.
सामान्य माणसांनाही विमान किंवा अन्य प्रवासी साधनांमधील तांत्रिक बाबी फारशा कळत नाहीत. ते अपेक्षितही नाही. तेव्हा नेता असो की सामान्य माणूस, मुद्दा प्रवाशांची सुरक्षितता हा आहे. बारामतीतील अपघाताने तो प्राधान्याने चर्चेत आला आहे. विमान प्रवास सुरक्षित करण्यासाठी सरकारे काय करत आहेत किंवा करणार आहेत हे लोकांना कळायलाच हवे. मागच्या अपघातांमधून संबंधित महासंचालनालय नेमके काय शिकले, हाही कळीचा मुद्दा आहे. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी यांनाही हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमवावे लागले. विजय रूपाणी, संजय गांधी, माधवराव सिंदिया, वाय. एस. राजशेखर रेड्डी, दोरजी खांडू, ओ. पी. जिंदाल, जी. एम. सी. बालयोगी या नेत्यानंतर अजित पवारांसारखा धडाडीचा नेता देशाने विमान अपघातात गमावला आहे. असा नेता घडायला दीर्घकाळ जावा लागतो. अजित पवारांच्या धडाडीचे, कार्यक्षमतेचे आणि सामान्य माणूसकेंद्री राजकारणाचे अनेक किस्से बुधवारपासून चर्चेत आहेत.
अपघातग्रस्त विमानातून उडालेली कागदपत्रे त्यांच्या झपाट्याची साक्ष मानली गेली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंनी गर्दी केली होती. बारामतीचे रस्ते ठप्प झाले होते. गर्दीतील प्रत्येकाचे त्यांच्याकडे काम होते असे नाही. तरीही घरचा माणूस गेल्याची सार्वत्रिक भावना उमटली. कारण अजितदादांसारखे नेते त्यांची स्वभाववैशिष्ट्येे आणि कार्यशैलीमुळे लोकांच्या मनात कायमचे स्थान मिळवतात. अशा नेत्यांचे अकाली जाणे विकासाची चळवळ अनेक वर्षे मागे घेऊन जाते. या अपघातात पवार कुटुंबियांसह अन्य चार कुटुंबांनी त्यांचे आप्त गमावले आहेत. तसेही सामान्य माणसांचा जीव किडामुंगीपेक्षाही स्वस्त झाला आहे. नोएडामध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेत त्या अभियंत्यांचा दोष होता का? मदतीची याचना करत असलेल्या आणि जगण्यासाठी दोन तास संघर्ष करत असलेल्या तरुण मुलाचा मृत्यू डोळ्यांदेखत पाहण्याची दुर्दैवी वेळ त्याच्या वडिलांवर आली. पप्पा, मला मरायचे नाही.. जगायचे आहे हे त्या मुलाचे रुदन त्याचे वडील वर्षानुवर्षे विसरू शकतील का? त्याला वाचवता आले नाही याची हतबलता त्यांना सुखाने जगू देईल का? कोणत्याही अपघातातील विशेष प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू चर्चेत येतो ते समजण्यासारखेच आहे.
तथापि, विविध प्रकारच्या अपघातांमध्ये, रुग्णालये-हॉटेल्स-क्लब, खासगी प्रवासी बसेस यांना लागलेल्या आगीमध्ये शेकडो माणसांचा जीव गेला आहे. त्याचे उत्तरदायित्व कोण घेणार? ते खरे तर सरकारांनीच घ्यायला हवे. कारण कोणताही प्रवास अधिकाधिक सुरक्षित करणे, सामान्य माणसांच्या जीवाची सुरक्षितता हे सरकारांचे प्रमुख कर्तव्य आहे. अपघात झाले की चर्चांचे घमासान.. समित्यांची नेमणूक.. आणि काही काळानंतर ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ असे यावेळी तरी घडू नये अशीच अजितदादांंची देखील अपेक्षा राहिली असती..





