अकरावी प्रवेश प्रक्रियेचे यावर्षीही तीनतेरा वाजले आहेत. शैक्षणिक वेळापत्रक कोलमडेल, अशीच चिन्हे आहेत. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असली तरी तिच्या आणखी काही फेर्या होतील. दहावीची परीक्षा मुले महत्प्रयासाने उत्तीर्ण होतात. शालेय बंधनाच्या जगातून तुलनेने मुक्त वातावरणातील महाविद्यालयात जाण्यास उत्सुक असतात, पण शालेय विभाग मात्र प्रवेशप्रक्रियेत दरवर्षीच मअनुत्तीर्णफ होतो.
परिणामी दहावी परीक्षा निकालाच्या ताणाची जागा अकरावी प्रवेशप्रक्रिया घेते. प्रवेश मिळेल का? तो मनपसंत महाविद्यालयांत मिळेल का? प्रक्रिया वेळेत पार पडेल का? उशीर झाल्यावर अभ्यास कधी करणार? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सतावतात. त्यांची उत्तरे मिळण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिना उजाडावा लागतो. त्यामुळे महाविद्यालयाची पायरी चढता-चढताच मुलांना अकरावीच्या सहामाही परीक्षेची तयारी करावी लागते. यावर्षी एकवीस लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या फरफटीला शिक्षण विभाग जबाबदार आहे.
वास्तविक अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात प्रवेशप्रक्रिया अचूक पार पडायला हवी, पण यावेळी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाल्याच्या काही वेळातच ती बंद पडली. नोंदणीच झाली नाही. काही दिवसांनी ती सुरु झाली तर राज्यातील सगळ्या महाविद्यालयांतील गुणांची मर्यादा (कट ऑफ) दिसत नव्हती. ती अजूनही सुरळीत झालेली नाही. एखादी तांत्रिक अडचण उदभवणे समजण्यासारखे आहे. मात्र अडचणींचा अडथळा कसा राहतो? दरवर्षी शैक्षणिक वेळापत्रक कोलमडते; तरीही सुधारणा होतच नाहीत.
मागच्या पानावरुन सारे पुढे सुरूच! शिक्षण विभागासाठी हे नैमित्तिक काम असले तरी विद्यार्थ्यांसाठी मात्र तो ताणाचा मुद्दा ठरतो. दिवसेंदिवस ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आणि किचकट बनत चालल्याचा अनुभव विद्यार्थी आणि त्यांचे पालक घेत आहेत. प्रवेश कधी होणार? ते मुलांना कळत नाही. महाविद्यालय तोपर्यन्त सुरु होत नाहीत. हा ताण मुलांनी का सहन करावा?
कामे बिनचूक होण्यासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार केला गेला, पण प्रवेशप्रक्रिया वेळेत आणि बिनचूक का पार पडत नाही? ही प्रक्रिया राबवणारी संस्था नवीन असल्याचे व त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत, असे सांगितले जाते. तसे असेलही कदाचित, पण त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना कशासाठी? क्षमता असलेली व कार्यक्षम मध्यस्थ संस्था शोधणे आणि तिची नेमणूक करणे ही शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. त्यात विभाग मअनुत्तीर्णफ झाला आहे. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये सध्या तरी कमालीची संभ्रमावस्था आहे.




