Tuesday, February 3, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ४ ऑक्टोबर २०२५ - लुटले राजकीय स्वार्थाचे सोने

संपादकीय : ४ ऑक्टोबर २०२५ – लुटले राजकीय स्वार्थाचे सोने

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची नांदी झडली. पूर्वी शिवाजी पार्क येथे भरणारा तत्कालीन शिवसेनेचा एकच दसरा मेळावा चर्चेत असायचा. शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाचे लोकांना आकर्षण असायचे. पण गेल्या काही वर्षांपासून दसरा मेळावा घेण्याची नवपरंपरा रुजली असावी. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे, पंकजा मुंडेचा भगवान गड येथे आणि नारायणगड इथे मेळावे पार पडले. यावेळी तर जरांगे यांनी देखील दसरा मेळाव्याला हजेरी लावली आणि भाषणही ठोकले. यानिमित्ताने सगळ्याच पक्षांनी राजकीय शक्ती प्रदर्शन केले. बहुतेक नेत्यांच्या भाषणाचे वर्णन मुलुखमैदान तोफ धडाडली असे केले गेले.

- Advertisement -

प्रत्येकाच्या भाषणातील मुद्दे, भाषणाचा पोत, आवेश आणि शैली वेगवेगळी होती तरी राजकीय स्वार्थ आणि निवडणुकीचे वेध हा एक सार सांगितला जाऊ शकेल. नेत्यांची वक्तव्ये तेच अधोरेखित करतात. ताकाला जाणून भांडे लपवण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली. संकटात घरी बसतो तो शिवसैनिक असतो का असा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला. शिवसेना प्रमुखांच्या खर्‍या विचारांचे खरे वारसदार असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न या दोघांनीही केला. जरांगे यांनी संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी केली तर पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्याला हात घातला. आरक्षणाला विरोध नाही पण आमच्या ताटातले घेऊ नका असे मत व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि मुबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे सगळ्याच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. त्यासाठीची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न मेळाव्याच्या निमित्ताने सगळ्यांनी केला. ताकदीचे प्रदर्शन करण्याची संधी साधली.

YouTube video player

कोणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होती याची आकडेमोड अजून काही दिवस सुरूच राहील पण सगळ्याच मेळाव्यांना गर्दी होती. या गर्दीचे प्रतिबिंब आगामी निवडणुकांमध्ये पडावे अशीच ज्याची त्याची इच्छा असणार. पण ते तसे पडत का नाही हा प्रश्न सगळ्या नेत्यांना कायमच पडत आला आहे. सभांना गर्दी करणार्‍या कार्यकर्त्यांमधील वाढत्या राजकीय महत्वाकांक्षा सगळ्याच राजकीय पक्षांची डोकेदुखी ठरू शकतील. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वैयक्तिक संबंध आणि प्रतिमा तितकीच महत्वाची मानली जाते हा भाग अलाहिदा. दसरा मेळाव्यांमुळे राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळेल की नाही ते आगामी काळच ठरवणार असला तरी नेत्यांनी बोलतांना मात्र एकमेकांवरच शरसंधान केले. ते करताना काहींची जीभही घसरली. सर्वानी राजकीय गणिते साधण्याचा प्रयत्न केला.

राजकारणात सदासर्वकाळ कोणीही शत्रू अथवा मित्र नसतो याचा अनुभवही लोकांना आला. पंकजा आणि धनंजय मुंडे एकमेकांची पाठराखण केली. राज आणि मी एकत्र राहण्यासाठीच असे उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले. नाही म्हणायला शेतकर्‍यांवर कोसळलेलीआपत्ती, जनतेच्या समस्या यांचा उल्लेख सगळ्यांनी केला असला तरी राजकारणाची गणिते साधताना जनतेच्या समस्या तोंडीलावणीच ठरतात असाही भाषणांचा अर्थ काढला जाऊ शकेल. या सगळ्या गदारोळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव पार पडला. नाव वेगळे असले तरी एका अर्थी तोही दसरा मेळावाच. हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. लोकशाहीतूनच बदल शय आहेत असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. हिंसेमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद नसते यावर त्यांनी भर दिला. त्यातील मर्म त्यांच्याही कार्यकर्त्यांना समजून घेण्याची गरज आहे.

विविध सामाजिक संस्थांच्या नावाखाली कार्यकर्त्यांचे गट उभे राहात आहेत. कार्यकर्त्यांमधील आक्रमकता वाढत आहे. संधी मिळेल तिथे तिचे प्रदर्शन केले जाते. हिंसक कृती वाढत आहेत. त्यात नेत्यांची आक्रमक भाषणे तेल ओततात. रस्त्यावर उतरून धुडगूस घालण्यासाठी, जीवघेणी मारपीट करण्यासाठी कोणतेही निमित्त पुरे ठरते. युवा पिढीत लोकशाहीपेक्षा ठोकशाहीचेआकर्षण वाढत आहे. त्यांना भागवत यांचा सल्ला मानवेल का? किंवा तसे प्रयत्न केले जातील का? अन्यथा नेत्यांची भाषणे आणि राजकीय कार्यकर्त्यांचे वर्तन यातील दरी वाढत चालली असावी. म्हणूनच हिंसा नको याची आठवण भागवत यांना करून द्यावी लागली असावी का? तात्पर्य दसरा मेळाव्यात विचारांऐवजी राजकीय स्वार्थाचेच सोने अधिक लुटले गेले.

ताज्या बातम्या

राहुल

Loksabha Session: राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत मोठा राडा; सभापतींवर कागदपत्रे फेकली,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiमंगळवारी संसदेच्या कामकाजादरम्यान, सभागृहाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे प्रकरण समोर आले. लोकसभेत झालेल्या गोंधळादरम्यान, काही खासदारांनी सभापतींवर कागदपत्रे फेकली. यावर...