केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवापिढीला खूप मोलाचा सल्ला दिला. अडचणी आणि संकटे येतातच. त्यापासून पळून जाणे योग्य नाही. त्यांचा सामना करण्यातच हित दडले आहे. जे काम कराल ते उत्तम करण्याचा प्रयत्न करा, असे हितगूज त्यांनी केले. या मार्गदर्शनाची केवळ युवा पिढीलाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही आत्यंतिक गरज आहे. सध्याच्या युवा पिढीत एकूणच संभ्रमावस्था वाढत आहे. तंत्रज्ञानात रोज होणारे नवनवे बदल, त्याचा रोजगार क्षेत्रावर होणारा अपरिहार्य बदल, जीवघेणी स्पर्धा, दिवसेंदिवस महागडे होत चाललेले उच्च शिक्षण आणि पालकांची आर्थिक क्षमता याचा ताण मुलांवर असणे स्वाभाविकच.
डार्क वेबचा विळखा हा अजूनच वेगळ्या चिंतेचा विषय आहे. अशा संकटांचा सामना करायला, ताणतणाव आणि भावनांचे नियमन करायला मुलांना शिकवलेच जात नाही असे मानसतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्यामुळे बहुसंख्य युवा पिढी कमालीची संभ्रमावस्थेत आढळते. जीवघेणी स्पर्धा, अपेक्षांचे ओझे, तंत्रज्ञानाच्या आविष्काराने साचेबद्ध शिक्षणापुढे उभे केलेले प्रश्न, रोजगारांची अनिश्चितता कशी हाताळावी हेच बहुसंख्य मुलांना कळत नाही आणि तसे प्रशिक्षण त्यांना देण्याच्या जाणिवेचा सार्वत्रिक पातळीवर अभाव आढळतो.
मुले मशीन बनली असावीत इतके साचेबद्ध वेळापत्रक आढळते. अपयशाचा स्वीकार अनेक मुले करू शकत नाहीत. यातून पळ काढण्याची वृत्ती बळावू शकते. परिणाम वाढते मानसिक अस्वास्थ्य, हतबलता आणि नैराश्य. ते अनेकदा जीवघेण्या पद्धतीने व्यक्त होते. वाढती हिंसक वृत्ती आणि युवांच्या वाढत्या आत्महत्या हा खोलवर सामाजिक चिंतेचा विषय आहे. परिस्थितीचा सामना करण्याची सकारात्मक वृत्ती युवांमध्ये रुजवायची असेल तर पालकांची मानसिकता महत्वाची भूमिका बजावते.
शिक्षण आणि करिअर याच्या पलीकडे एक आयुष्य असते याची जाणीव किती पालकांना असू शकेल? मित्र, नातेवाईक, समारंभ, वाचन, विनाउद्देश फिरणे, गप्पा मारणे, वेळ वाया घालवणे, खेळ, सणवार, भेटीगाठी यातूनही मुले सामाजिक मूल्ये शिकतात. भावनिकता, हळवेपणा, संवेनशीलता यातून रुजते. पण यात मुलांनी वेळ वाया घालवू नये असेच बहुसंख्य पालकांना वाटत असावे. शक्ती दुबे ही यूपीएससी परीक्षेत देशात पहिली आली आहे. या परीक्षेची काठिण्य पातळी वेगळी सांगायला नको. पण ती फक्त एक परीक्षा आहे, आयुष्यापेक्षा मोठी गोष्ट नाही असेच शक्ती म्हणते. त्यातील मर्म पालकांनी लक्षात घेण्याची गरज आहे.
प्रत्येक मूल वेगळे असते. त्यांच्या आवडीनिवडी, क्षमता आणि कौशल्ये वेगवेगळी असतात. त्या जाणून घेण्याची खरी गरज आहे. अनेक गोष्टींच्या बाबतीत पालकच टोकाला जात असतील तर मुले तरी वेगळे काय शिकू शकतील? उदाहरणार्थ, मोबाईल. त्याचा परिचय आणि कळत-नकळत सवय लागण्यास पालकही कारणीभूत असतात. त्याचे दुष्परिणाम लक्षात येताच अनेक पालक मोबाईल काढूनच घेतात किंवा मुलांवर सारखे लक्ष ठेवतात. सगळेच पालक सुजाण नसू शकतील पण तीदेखील काही प्रमाणात शिकण्याची गोष्ट आहे हे समजून घ्यायला हवे.
मुलांना वेळच्यावेळी सगळ्या गोष्टी घेऊन देणे म्हणजे पालकत्व नव्हे. त्यापलीकडे जाऊन शिकता शिकता मुलांचे व्यक्तिमत्व फुलण्यासाठी पालकांनाच काम करावे लागेल. ती बाब फक्त शाळांवर ढकलून मोकळे होता येऊ शकेल का? मुलांचा भावनिक गरजा आधी पालकच पूर्ण करू शकतात. त्यासाठी संवादाचा पूल बांधणे आणि त्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. त्यातून मुलांशी सहवास वाढू शकेल. मुले मोकळी होऊ शकतील. पालक आणि मुले यांच्यात विश्वासाचे बंध निर्माण होऊ शकतील.
मुलांच्या मनाचा तळ पालक गाठू शकतील. त्यांच्या मनात सुरु असलेली उलथापालथ त्यातून लक्षात येऊ शकेल. परिस्थिती कशीही असली तरी पालक त्यांच्या पाठीशी आहेत असा विश्वास त्यातून मुलांच्या मनात निर्माण होऊ शकेल. चांगला माणूस घडवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. मुलांचे हे लई नाही मागणे. पालक त्यांच्या मुलांना पोटचा गोळा मानतात. मुलांच्या भविष्यासाठीच कष्ट करतो असे बहुसंख्य पालक आग्रहाने सांगतात. त्या पोटच्या गोळ्यासाठी इतके तर पालक करूच शकतात. तेव्हा, गडकरी यांनी दिलेला सल्ला मोलाचा आहेच. तथापि तो पालकांनी आधी अंमलात आणायला हवा.




