Friday, January 23, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ६ ऑगस्ट २०२५ - कसोटीचा थरार

संपादकीय : ६ ऑगस्ट २०२५ – कसोटीचा थरार

भारत-इंग्लड अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने मिळवलेल्या विजयाचे चित्तथरारक असेच वर्णन केले जाऊ शकेल. असे विजय कसोटी क्रिकेटमध्ये जीव ओततात. कसोटी क्रिकेट आकर्षक बनवतात. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. कसोटी क्रिकेटचे सामनेदेखील रोमांचक, रंगतदार आणि थरारक असतात, हे अधोरेखित करतात. दहा आणि वीस षटकांचे सामने पाहायला सरावलेली युवा पिढीदेखील अखेरच्या दिवशी टीव्हीला चिकटली होती. त्यांनीच समाज माध्यमांच्या व्यासपीठावरून हा विजय साजरा केला.

अर्थपूर्ण व्यंगचित्रे (मिम्स) यांनी हे माध्यम भरून वाहिले. त्याची कारणे हीच होती. महान खेळाडू सचिन तेंडुलकर यानेही टेस्ट क्रिकेट.. खरेच शहारे आणणारा सामना होता असेच याचे वर्णन केले. सुनील गावस्कर यांनी मैदानात उतरून ‘मेरे देश की धरती..’ हे गाणे गायले. खेळाडू घडण्यातील कसोटी क्रिकेटच्या महत्तेचा पुनरुच्चार अनेक दिग्गज आणि महान खेळाडू वारंवार करतात. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, न्यूझीलंडचा टॉम लॅथम अशी कितीतरी नावे सांगितली जाऊ शकतील. ज्यांची जडणघडण कसोटी क्रिकेटनेच केली.

- Advertisement -

अनुभव हा श्रेष्ठ गुरू मानला जातो. खेळल्याशिवाय तो कसा मिळणार? त्यासाठी दीर्घकाळ खेळ खेळणे अपरिहार्य! ती संधी कसोटी क्रिकेट देते. त्यात खेळाडूंचा शारीरिक आणि मानसिक कस लागतो. संयमाची परीक्षा होते. खेळाडू तंत्रशुद्ध खेळ शिकतात. तंदुरुस्तीला पर्याय नाही हे त्यांच्या मनावर ठसते. याच कौशल्यांच्या आधारावर खेळाडू मैदानात टिकाव धरतात. पाच दिवस मैदान मारायचे असेल तर खेळाडूला स्वतःची रणनीती आखावी लागते. ती अंमलात आणावी लागते. खेळाच्या आणि संघाच्या गरजेनुसार त्यात बदल करावा लागतो आणि महत्त्वाचे म्हणजे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेऊन संघ किंवा देशासाठी खेळावे लागते. भावनांवर कमालीचे नियंत्रण ठेवावे लागते. हे सगळे कसोटी क्रिकेट शिकवते, असे ज्येष्ठ खेळाडू मानतात. म्हणूनच कसोटी क्रिकेटला दर्जेदार खेळाडूंची शाळा मानतात.

YouTube video player

तथापि झटपट क्रिकेटच्या लोकप्रियतेच्या गारूडाखाली कसोटी क्रिकेट झाकोळू नये म्हणूनच कदाचित बीसीसीआयने हे क्रिकेट खेळाडूंसाठी प्रोत्साहन योजना लागू केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नियमात आमूलाग्र बदल केले. कसोटी क्रिकेटचा सामना पाच दिवसांचा असतो. तो चारच दिवसांचा असेल. इत्यादी इत्यादी. खेळ संघभावना, निकोप स्पर्धा, समर्पण अशी जीवनावश्यक विविध मूल्ये रुजवतो असे म्हटले जाते. अखेरच्या सामन्याने त्या मूल्यांचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना दिला असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनसारखे दिग्गज खेळाडू नव्हते. बुमराह हा भारताचा आघाडीचा गोलंदाज काही सामने खेळणार नव्हता. संघाचा कप्तान शुभमन गिलच्या पाठीशी कर्णधारपदाचा अनुभव फारसा नाही. याचा ताण संघातील खेळाडूंवर येणे स्वाभाविकच. या पार्श्वभूमीवर आपल्या खेळाडूंनी कमाल करून दाखवली.

देशासाठी काहीपण याची अनुभूती संघातील खेळाडूंनी आणून दिली. मोहम्मद सिराज याने बुमराहची कमी भरून काढली. त्याने या मालिकेत सुमारे अकराशेपेक्षा जास्त चेंडू फेकले. देशासाठी देताना विचार करायचा नसतो. मी प्रत्येक चेंडू देशासाठी टाकतो, हे त्याचे शब्द उत्तम, पुरेसे बोलके आहे. आकाशदीप इंजेक्शन घेऊन मैदानात उतरला होता. यात प्रतिस्पर्धी इंग्लडचे खेळाडूदेखील मागे नव्हते. क्रिस वोक्सचा खांदा मोडला होता. तरीही तो संघासाठी खेळला. तेव्हा प्रेक्षकांना ऋषभ पंत आठवला असणार. याच मालिकेतील मँचेस्टर येथील सामन्यात ऋषभ खेळला तेव्हा त्याचेही बोट मोडले होते. समर्पण यापेक्षा वेगळे नसते. सर्वात महत्त्वाचे खेळाडूंनी शस्त्रे टाकली नाहीत. कोणत्याही क्षणी हार मानली नाही. त्यामुळे भारत-इंग्लड कसोटी मालिका बरोबरीत सुटली. अखेरचा सामना प्रेक्षक दीर्घकाळ लक्षात ठेवतील. यानंतर खेळाडू आणि प्रेक्षक कसोटी क्रिकेटवर पण प्रेम करतील, दाद देतील आणि सामने पाहायला गर्दी करतील अशी आशा या सामन्याने पल्लवित केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...