Thursday, November 21, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ७ ऑक्टोबर २०२४ - रेल्वेमंत्री येता घरा...!

संपादकीय : ७ ऑक्टोबर २०२४ – रेल्वेमंत्री येता घरा…!

साधू-संत येति घरा, तोचि दिवाळी-दसरा अशी संतपंक्ती आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. दसर्‍याला अजून काही दिवस अवकाश आहे. दिवाळी तर त्याहून दूर आहे. मात्र त्याआधीच नाशिककरांना त्या संतपंक्तीचा प्रत्यय आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दोन दिवसांपूर्वी नाशिक दौर्‍यावर येऊन गेले. त्यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकाला भेट दिली.

रेल्वे सुरक्षा दलाच्या नाशिकरोड स्थानकावरील कार्यालयात आरपीएफचा चाळिसावा स्थापनादिन वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. रेल्वेमंत्र्याने एखाद्या रेल्वे स्थानकावर येणे ही तशी दुर्मिळ गोष्ट! नाशिककरांचे भाग्य म्हणून रेल्वेमंत्री वैष्णव नाशिकरोडला आले. केंद्र सरकारमधील ‘सुपर मिनिस्टर’पैकी ते एक असून कडक शिस्तीचे मंत्री म्हणून ओळखले जातात. अशा मंत्र्याच्या स्वागतात कोणतीही कसर राहू नये म्हणून रेल्वेचे मुंबई आणि भुसावळ मुख्यालयांतील प्रमुख अधिकारी नाशिकरोड रेल्वे स्थानकाला सजावण्या-धजावण्यासाठी आठवडाभर डेरेदाखल झाले होते.

- Advertisement -

स्थानकावरील स्वच्छतेकडे स्थानक प्रशासनाकडून बर्‍यापैकी लक्ष दिले जाते. तरीही रेल्वेमंत्र्यांच्या दौर्‍यानिमित्त रंगरंगोटी आणि साफसफाई करून नाशिकरोड स्थानक नव्या नवरीसारखे नटवण्यात आले. दसरा-दिवाळी आल्याचा आभास स्थानकावर येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांना होत होता. रेल्वेगाड्या,सोयी-सुविधा यांच्या बाबतीत नाशिककर प्रवाशांची सतत उपेक्षा होत आली आहे. नाशिकसाठी असलेल्या काही गाड्या कालांतराने दुसरीकडे पळवण्यात आल्या. काही रेल्वे प्रकल्प प्रलंबित असून ते अद्याप कागदावरच आहेत. नाशिकच्या होणार्‍या उपेक्षेबद्दल नाशिककर प्रवासी अधून-मधून संतापही व्यक्त करतात, पण त्याकडे रेल्वेकडून अजूनसुद्धा गांभीर्याने पाहिले जात नाही.

रेल्वेमंत्र्यांच्या भेटीनिमित्त प्रलंबित प्रश्न त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा असल्याने नाशिककरांनी रेल्वेमंत्र्यांचे उत्साहात स्वागत केले. नाशिकचे नवे खासदार राजाभाऊ वाजे यांनी वैष्णव यांची भेट घेऊन मतदारसंघातील रेल्वेविषयक प्रलंबित प्रश्नांची जंत्रीच त्यांच्यापुढे मांडली. नाशिक-पुणे महारेल, नाशिक-कल्याण उपनगरी सेवा, नाशिक ते वावधान बंदर त्र्यंबकेश्वरमार्गे नवा रेल्वेमार्ग आदी प्रकल्प मार्गी लावावेत, पंचवटी आणि राज्यराणी या नाशिककरांच्या हक्काच्या एक्स्प्रेस गाड्यांना त्यांचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यावे, नाशिकरोडवरून संभाजीनगर, पुणे, नागपूर आणि मुंबईसाठी ‘वंदेभारत’ रेल्वेसेवा सुरू करावी आदी प्रमुख मागण्या खासदार वाजे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या.

या मागण्यांबाबत रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन नाशिकच्या खासदारांना आश्वस्त केले. नाशिकचे रेल्वेविषयक प्रश्न येत्या काळात मार्गी लागतील आणि चांगली रेल्वेसेवा उपलब्ध होईल, अशा नाशिककरांच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या आहेत. रेल्वेचे खासगीकरण होणार नाही या आश्वासनाचा रेल्वेमंत्र्यांनी नाशिकरोडच्या कार्यक्रमात पुनरुच्चार केला. नियोजित कार्यक्रमानंतर रेल्वेमंत्र्यांनी नाशिकच्या पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी नाशिक-मुंबई उपनगरी सेवेबाबत त्यांनी आनंदाची बातमी दिली. ही मागणी ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ प्रकल्पातून पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील शेतमाल वाहतुकीसाठी सर्वतोपरी मदत रेल्वेकडून केली जाईल, वेगवेगळ्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी नव्या डब्यांची रचना करण्याचे आदेशही रेल्वे अधिकार्‍यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. खासदार वाजे धडाडीचे लोकप्रतिनिधी आहेत. संसद अधिवेशनावेळी दिल्लीत गेल्यावर या सर्व आश्वासनांची आठवण ते रेल्वेमंत्र्यांना करून देतील, त्यांच्याकडे आणि रेल्वे मंत्रालयाकडे सर्व मागण्यांचा पाठपुरावा नक्की करतील याची नाशिककरांना खात्री आहे. रेल्वेमंत्र्यांचा दौरा नाशिकसाठी फलदायी ठरो हीच अपेक्षा!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या