Saturday, January 24, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ८ जानेवारी २०२६ - शहाणे होण्याची गरज

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे. शत्रूला मित्र म्हणून जवळ करायचे. मित्राची गणना शत्रू म्हणून करायची. स्वार्थासाठी त्यांचीही सरमिसळ करायची. सरड्यासारखे रंग बदलायचे आणि त्याचे समर्थन देखील करायचे. खोटेच रेटून बोलायचे की ते खरेच वाटले पाहिजे आणि या सगळ्या गदारोळात स्वतःचा खरा चेहरा कायम राखायचा. सामान्य माणसे बिचारी एकाच चेहर्‍याने जगतात तरी त्यांना त्यांचे जगणे अवघड वाटते.

- Advertisement -

पक्ष आणि त्यांचे नेते एकाच वेळी असंख्य चेहर्‍यांनी वावरतात आणि तरीही त्यांचा कधीही गोंधळ उडत नाही. काल ज्याची स्तुती केली, त्याच्या नावाने दुसर्‍या दिवशी खडे फोडतानाही चेहर्‍यावरचे लबाड हसू विरत नाही. आणि सगळेच राजकारणी राजकीय नीतिमत्ता, साधनशुचिता, पक्ष विचारधारा आणि पक्षनिष्ठेचे डोस कार्यकर्ते आणि जनतेला पाजतात. हे काम सोपे अजिबात नाही. म्हणूनच नेते बनणे हे काम नोहे येरागबाळाचे, असे म्हणतात ते उगाच नव्हे. राज्यात महानगरपालिकांच्याच नव्हे तर सगळ्याच निवडणुकांसाठी हे वर्णन चपखल लागू होऊ शकेल. एक सत्ताधारी पक्ष आणि बाकी सगळे विरोधी पक्ष अशी परिस्थिती आता अभावानेच आढळू शकेल.

YouTube video player

निवडणुकीत एकूण पक्ष किती, सत्ताधारी पक्ष किती, विरोधी पक्ष किती, कोणत्या पक्षाची कोणाबरोबर युती आहे हे नेते देखील कदाचित ठामपणे सांगू शकणार नाहीत. त्यामुळे मतदार भांबावले असतील किंवा त्यांचा आवडता आणि नावडता पक्ष कोणता हेच त्यांना कळेनासे झाले असेल तर त्यात नवल नाही. तथापि, मतदारांनाच शहाणे व्हावे लागणार आहे. सरकार निवडण्याची आणि लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी घटनेने त्यांच्यावर का सोपवली याचे किमान ज्ञान त्यांना असणे किंवा त्यांनी ते माहित करून घेणे गरजेचे होत चालले आहे. कारण मतदारांना गृहीत धरून राजकारण म्हणजे खिचडी होत चालले आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी मतदान करून कर्तव्य पार पाडणे आता पुरेसे ठरणार नाही. सुजाण नागरिक म्हणून त्यांनी देखील राजकारणाचा आणि राजकीय घडामोडींचा अभ्यास करून स्वतःचे मत ठरवावे हीच जाणत्यांची अपेक्षा असणार.

राजकारणातले काही कळत नाही असा जनतेचा समज राजकारण्यांच्या पथ्यावर पडतो हे लोकांनी आता लक्षात घ्यायला हवे. युवा पिढीला निवडणूक प्रक्रियेत रस वाटत नसेल तर त्यापरते लोकशाहीचे दुसरे दुर्भाग्य कोणते असू शकेल? तरुण मतदारांची संख्या वाढत आहे. तरुण मतदार नाराज का आहेत, त्यांना मतदान करावेसे का वाटत नाही याचा विचार जसा राजकीय पक्षांनी करायला हवा, तसाच तो युवांनी पण करायला हवा. मतदान न करणे, प्रक्रियेत स्वारस्य न दाखवणे ही पळवाट मानली जाऊ शकेल. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकूण मतदारांमध्ये तरुण मतदारांची संख्या लाखोंच्या घरात होती. ती वाढतच जाणार आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी मोठी आहे.

राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी गृहीत धरू नये असे लोकांना वाटत असेल तर त्यांनी शहाणे होणे, किमान राजकारण समजवून घेणे, मतदानाची ताकद ओळखणे हाच त्यावरचा उपाय आहे. जे त्यांच्याकडे मत मागायला येतील त्यांना किमान त्यांच्या वॉर्डापुरते तरी प्रश्न लोक नक्की विचारू शकतील. वॉर्डातील मूळ समस्यांची किती सखोल माहिती आहे हे माहित करून घेऊ शकतील. लोकमत संघटित नसणे राजकारण्यांच्या नेहमीच पथ्यावर पडते हे आता लोकांनीच लक्षात घेणे आवश्यक आहे. वास्तविक, लोकशिक्षण हा निवडणूक प्रचाराचा एक उद्देश असायला हवा. पण एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणे हाच सध्याच्या प्रचाराचा एकमेव उद्देश उरला असावा.

लोक सुजाण आणि समंजस झाले तर राजकीय बजबजपुरीला आळा बसण्याची शक्यता किमान तरी बळावेल. मत विकले जाणार नाही आणि ते विकत मागताना दहा वेळा विचार करायला भाग पाडले जाऊ शकेल. मतदारांना गृहीत धरता येणार नाही, लोकप्रतिनिधी त्यांना उत्तरदायी आहेत इतके जरी पक्ष आणि नेत्यांच्या लक्षात आले तरी पुरे होऊ शकेल.

ताज्या बातम्या

पडसाद : अस्तित्वाच्या संघर्षात छोटे पक्ष घायाळ

0
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविल्याने अनेक छोट्या पक्षांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. केवळ छोटेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसारख्या तुलनेने मोठ्या...