Wednesday, January 7, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ८ ऑक्टोबर २०२५ - सुजाण संगोपन हाच उपाय

संपादकीय : ८ ऑक्टोबर २०२५ – सुजाण संगोपन हाच उपाय

मुलांमधील मोबाईलचे वाढते व्यसन आणि त्याचे मानसिक-शारीरिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ही सामाजिक समस्या आहे. प्रसंगी हे परिणाम हिंसकही असतात. मुलांमध्ये नैराश्य आणि ताणतणाव वाढतात. भावनांची तीव्रता -चढउतार कसे हाताळायचे हे मुलांना उमजत नाही. तसे शिकवलेही जात नाही. परिणामी मानसिक अस्वस्थ मुले दुसरे टोक गाठण्याच्या धोक्याकडे मानसतज्ञ सातत्याने लक्ष वेधून घेतात. मुले मनाने देखील ऑनलाईन राहू लागली आहेत हे लक्षात आणून देतात. नकळत्या आणि अडनिड्या वयाच्या युवांचे त्यातील प्रमाण अधिकच चिंताजनक आहे. मुले यामुळे आभासी जगात रमतात. तेच जग त्यांना खरे वाटू लागते. वास्तवाशी त्यांची फारकत होते. समाज आणि कौटुंबिक मुल्यांच्या घसरणीचे उपरोक्त व्यसन हे देखील एक प्रमुख कारण आहे.

- Advertisement -

मुलांकडून मोबाईलचा अतिरिक्त आणि वाढता वापर कमी करण्याचे अनेक उपाय तज्ज्ञ सुचवतात. वापरकर्त्यांची माध्यम साक्षरता आणि समज वाढवावी असे ते सुचवतात. मुलांना निसर्गाच्या सानिध्यात नेणे, बागकामासारखा एखादा छंद त्यांनी जोपासणे, छोट्या छोट्या गोष्टींमधीलआनंद त्यांना घ्यायला शिकवणे, वाचनाची सवय जडवणे, वेळ घालवण्याच्या अशा अनेक कृती शोधणे हे त्यापैकी काही उपाय. हे उपाय अंमलात आणणे ही प्रामुख्याने पालकांची जबाबदारी आहे आणि तिथेच अनेक पालकांचे घोडे पेंड खाताना आढळते. बहुसंख्य पालकच मोबाईलमध्ये डोके खुपसून बसतात. दिवसभर व्यस्त घालवल्यानंतर मोबाईलवर वेळ घालवणे अनेकांना तो त्यांचा हक्कच वाटतो. पण त्यामुळे मुलांचा हक्काचा वेळ त्यांना नाकारतो हे किती पालकांच्या लक्षात येते? मुलांचे मोबाईलचे व्यसन सोडवायचे असेल तर बदलांची सुरुवात पालकांना त्यांच्यापासून करावी लागेल. केरळ सरकारने सुरु केलेला एक उपक्रम याबाबतीत मार्गदर्शक ठरू शकेल. यासंदर्भातील वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे.

YouTube video player

केरळ सरकारने या मुद्यावर सर्वेक्षण केले. मोबाईलच्या वाढत्या व्यसनामागे मुलांच्या संगोपनातील पालकत्वाच्या त्रुटी हा एक मुख्य निष्कर्ष त्यांना आढळला. दोन्हीही पालकांची व्यस्तता, कौटुंबिक वाद, पालकांना जडलेली मोबाईल वापराची सवय आणि पालक-मुलांमध्ये कमी होत चाललेला संवाद ही काही प्रमुख कारणे सर्वेक्षणात नमूद असल्याचे वृत्तात म्हंटले आहे. त्यावर उपाय म्हणून केरळ सरकारने चौदा जिल्ह्यात १५२ विभागांमध्ये मोफत पालकत्व क्लिनिक सुरु केले आहे. त्यात दर शनिवारी पालकत्वाचे वर्ग भरतात. मोबाईल संदर्भात पालक त्यांना भेडसावणार्‍या समस्या तिथे मांडतात. त्यावर पालकांचे आणि मुलांचे समुपदेशन केले जाते. समस्यांवर त्यांना मार्ग सुचवले जातात. छोट्या क्लिनिकमध्ये समस्या सुटली नाही तर पालकांना वरिष्ठ स्तरावरील केंद्रात पाठवले जाते. पालकांची मोबाईल वापराची सवय नकळत मुलांना कशी जडते हे पालकांना समजावून सांगितले जाते. त्यांना आत्मचिंतन करायला लावले जाते. सगळेच पालक क्लिनिकपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांच्यासाठी पंचायतींमध्ये शिबिरेआयोजित केली जातात असेही त्या वृतांत म्हटले आहे.

हा उपक्रम प्रेरणादायी ठरू शकेल. पालक आणि मुलांमधील सुसंवाद वाढणे गरजेचे आहे. तो नसल्यामुळे देखील मुले तणावात येतात. पालक मुलांच्या सगळ्या गरजा पुरवतात. त्यांना पाहिजे ते घेऊन देतात. पण त्यांना गुणवत्तापूर्ण वेळ (क्वालिटी टाइम) द्यायला हवा. त्यातून मुलांची मानसिक भूक भागू शकेल. त्यांच्या मुलांच्या मनाचा तळ पालकांना कदाचित लागू शकेल. मुले त्यांच्या भावना पालकांना सांगू शकतील. त्यातील चढउतारात त्यांना सहभागी करून घेऊ शकतील. समस्या कोणतीही असो, पालक त्यांच्या पाठीशी आहेत असा विश्वास मुलांच्या मनात पालक निर्माण करू शकतील. हे सगळे तेव्हाच शक्य होऊ शकेल जेव्हा पालक वेळ काढतील. त्यांच्याही जाणिवा समृद्ध होतील.

केरळमध्ये त्यासाठी क्लिनिक चालवले जातात. अन्य ठिकाणी देखील असे अनेक मार्ग उपलब्ध असू शकतील. तज्ज्ञ या विषयांवर माध्यमांमध्ये सातत्याने विस्तृतपणे लिहितात. सामाजिक संस्था सातत्याने उपक्रम घेतात. शिबिरे भरवतात. मोफत सल्ला केंद्रे चालवतात. त्यांचा आधार पालक घेऊ शकतील. एकुणात काय तर केवळ मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठीच नव्हे तर सुजाण नागरिक घडवण्यासाठी सुजाण पालकत्व आवश्यक आहे हेच केरळ सरकारच्या उपक्रमातून अधोरेखित होते.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...