‘सुहास्य हा सुंदर दागिना आहे’ असा सुविचार शाळांमध्ये शिकवला जातो. कालांतराने मानवी आयुष्यातील त्याचे अस्तित्व फक्त फलकापुरतेच उरते का? माणसे हसणे विसरत चालली असावीत. म्हणूनच विविध व्याख्याने आणि भाषणांमधून त्यांना हसण्याची आठवण करून दिली जात असावी. हास्य पुन्हा शिकण्यासाठी माणसे एकत्र जमू लागली असावीत.
एका हास्यकवीने नुकतेच त्यांच्या भाषणातून लोकांना हसण्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. मानवी हास्यावर संशोधने सुरू असल्याची माहिती प्रसारमाध्यमांत अधून-मधून प्रसिद्ध होते. हसायचे अनेक फायदे सांगितले जातात. हसणे शारीरिक आणि विशेषतः मानसिक ताणतणाव हलका करू शकते, याचा अनुभव सामान्य माणसेदेखील घेतात. हसणे मनाला ताजेतवाने करू शकते. म्हणजे ऊर्जा वाढवू शकते. नकारात्मक भावनांचा प्रभाव कमी करू शकते. माणसाचा मूड चांगला करणार्या हार्मोन्सला स्रवणाची चालना देऊ शकते.
विनोदी स्वभावाची माणसे जास्त जगतात, असे जुनी-जाणती माणसे सांगतात. तरीही माणसे नैसर्गिक हसणे का विसरत चालली असावीत? त्यांच्या अंगभूत स्वभाव वैशिष्ट्याचा त्यांना विसर का पडत चालला असेल? हसणे सुखाचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जाते. आयुष्यातील कोणतेही सुखद क्षण आठवले तरी माणसाच्या चेहर्यावर आपोआपच हास्य फुलते ते बहुधा यामुळेच! मानवी आयुष्यातील हास्याची किंमत फार मोठी असली तरी हास्याला पैसे लागत नाहीत, याची जाणीव माणसांना कधी होऊ शकेल? ताणतणाव आणि मानसिक विकार वाढत आहेत.
भावनांचा कोंडमारा आणि मनात विविध प्रकारचा कचरा भरण्याची सवय हे त्याचे प्रमुख कारण मानले जाते. नकारातमक संवाद, मानापमान, नकोशा आठवणी, दुःखद क्षण, अशा अनेक गोष्टी माणसे वर्षानुवर्षे साठवून ठेवतात. त्याचा दोष इतरांना देतात आणि तेच क्षण परत देण्याच्या भावनेने पछाडलेले असतात. परिणामी माणसे मनाने आजारी होत आहेत, असे मानसतज्ञांचे निरीक्षण आहे. यात बदल करणे माणसाच्याच हाती आहे. धरून ठेवण्याचे विरुद्धार्थी शब्द सोडून देणे, ते कसे करायचे याचे मार्गदेखील तज्ञ सांगतात.
मनातील कचरा काढून टाकून मन प्रसन्नतेने भरले तर हसण्याची वेगळी आठवण करून देण्याची वेळ अन्य कोणावर येईल का? घरातील एखादा कोपरा रिकामा केला तर तिथे पुन्हा अडगळ ठेवायची इच्छा नसतेच. हेच गृहितक मनालाही लागू पडेल. बरोबरीने अजून एक सवय माणसे त्यांच्या मनावर बिंबवू शकली तर… मनातील कचरा रिकामा करण्यासाठी कष्ट घेण्यापेक्षा कचरा भरलाच नाही तर? त्यासाठी कष्ट घेतले तर?