सुखकर्त्या दुखहर्त्या बाप्पांचे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आगमन झाले आहे. माणसांच्या उत्साहात बाप्पाही दहा दिवस सहभागी झाले आहेत. सगळीकडे आनंदाला उधाण आले आहे. याच दिवसात गौरींचे आगमन होईल. त्यांचे स्वागत-त्यासाठी केलेली आरास, पूजा-प्रसाद आणि देखावे दर्शन अशी दहा दिवस रेलचेल असेल.
दैनंदिन चक्रातून तात्पुरती सुटका झाल्याचे समाधान माणसांना मिळू शकेल. तशीही माणसे नेहमीच सुखाच्या शोधात असतात. त्यांना पडलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे सुखाच्या शोधाशी येऊन ठेपतात. तथापि माणसे अशीच तात्पुरत्या सुखाच्या मोहात नेहमीच सापडत असावीत का? व्यक्तिगणिक सुखाची व्याख्या बदलते हे खरेच. पण आरोग्यम् धनसंपदा, मनःशांती, स्वस्थता आणि त्यातून मिळणारा दीर्घकालीन समाधान आणि आनंद याचा माणसाला विसर पडत चालला असावा का? शाश्वत सुखाचा मार्ग पूर्वसुरींनी आणि संतांनी सांगून ठेवला आहे. तो अंमलात आणणे माणसे विसरत चालली असावीत.
माणसे बाह्य आणि दिखाऊ सुखाच्या मागे लागलेली आढळतात. भौतिक सुखात जास्त रममाण होतात. त्यात गैर नाही. भौतिक गोष्टींच्या साहाय्याने माणसाचे जगणे सुकर आणि सुसह्य झाले. पण त्यांच्याच साहाय्याने शाश्वत सुखप्राप्ती करून घेणे माणसांना का जमत नसावे? माणसे स्वमग्न होत चालली आहेत. एकट्यात रममाण होत आहेत. मानवी मूल्यांचा विसर पडत चालला आहे. दैनंदिन जगणे बेशिस्त झाले आहे. सामाजिक कर्तव्यांचा विसर माणसांना पडत चाललेला आढळतो. परिणामी त्यांच्यासारख्या हाडामांसाच्या अन्य माणसांच्या वेदना, दुःख, सामाजिक सौहार्द, बांधिलकी आणि मदत-सहकार्याची अपेक्षा हे अनेकांच्या मनाशी पोहोचेनासे झाले आहे.
अनेकदा अनेक माणसे वेड्यासारखीच वागताना आढळतात. अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी त्यांचे चित्रीकरण करणे, नियम न पाळणे, सार्वजनिक शिस्त न पाळणे, भेदाभेदांच्या आहारी जाणे, घराघरात हरवत चाललेला सुसंवाद आणि वाढत चाललेला वितंडवाद, मूल्यहीनता ही त्याची काही चपखल उदाहरणे. डीजेच्या कानठळ्या, लाईट्सचा अतिरेकी वापर यामुळे जगणे आनंदी करणार्या उत्सवांचे अतिरेकात रूपांतरण करतात हे लक्षात का येत नाही? माझा आनंद मिळवताना दुसर्याला त्रास होतोय का असा प्रश्नही माणसाला पडत नसावा का? अशी बुद्धी हरवत चाललेली प्रजा वाढत जाणे म्हणजे सामाजिक अराजकतेकडे जाणेच नव्हे का? बाप्पा तू बुद्धीचा दाता आहेस. दहा दिवस आला आहेस. माणसांचा लाडका आहेस. तूच माणसाला शाश्वत सुखाची जाणीव करून देऊन त्याकडे वाटचाल करण्याची सद्बुद्धी दे हीच आमची प्रार्थना.