Saturday, July 27, 2024
Homeनगरधरणातील पाणी काटकसरीने वापरा

धरणातील पाणी काटकसरीने वापरा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने पुढील टंचाई गृहित धरून अधिकार्‍यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. ज्या गावांतून टँकरचे प्रस्ताव येतील, तेथे प्राधान्याने पाहणी करून पाच दिवसांत टँकर मंजूर करावेत. याशिवाय पीकविमा भरपाई, कांदा अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना केल्या. गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचार्‍यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री विखे यांनी दिले.

- Advertisement -

यावेळी आ. बबनराव पाचपुते, आ. आशुतोष काळे, आ. लहू कानडे, आ. राम शिंदे, आ. डॉ. किरण लाहमटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रारंभी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, धरणसाठे, तसेच टँकरची स्थिती याची माहिती पालकमंत्र्यांना दिली. जिल्ह्यातील 9 मंडलात 0 ते 25 टक्के, 57 मंडलात 25 ते 50 टक्के, तसेच 26 मंडलात 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

यावर आ. कानडे यांनी आक्षेप घेत अधिकार्‍यांनी केवळ तांत्रिक माहितीच्या आधारे पावसाची नोंद न घेता, प्रत्यक्ष गावात जाऊन माहिती घ्यावी. तसेच जेथे पर्जन्यमापक यंत्रे नाहीत, तेथे ते तातडीने बसवावीत, असे सांगितले. उत्तरेतील धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र, दक्षिण भागातील धरण साठ्यांची स्थिती चिंंताजनक आहे. दक्षिणेतील मांडओहोळ 7 टक्के, घाटशिळ 7 टक्के, सीना 26 टक्के, खैरी 16 टक्के, विसापूर धरणात 5 टक्के एवढाच साठा आहे. त्यामुळे पुढे पाऊस झाला नाही, तर या भागातील रब्बी हंगामही धोक्यात येणार असल्याची चिंता आमदारांनी व्यक्त केली. त्यावर आ. शिंदे यांनी कुकडीचे आवर्तन सोडण्याची मागणी केली.

जिल्ह्यात सध्या 60 टँकरव्दारे 66 गावे व 389 वाड्यांना पाणीपुरवठा होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यावर कर्जत-जामखेड तालुक्यांत मागणी करूनही टँकर मंजुरीसाठी उशीर होत असल्याचा आक्षेप आ. शिंदे यांनी घेतला. याचाच धागा पकडत कर्डिले यांनी टँकर मंजुरीचे अधिकार बीडीओंना द्या. म्हणजे वेळ जाणार नाही, असे सूचवले. त्यावर पालकमंत्री विखे यांनी सूचना देत, ग्रामपंचायत व तालुका पातळीवरील अधिकार्‍यांनी समन्वय ठेवून मागणी येईल तेथे केवळ पाच दिवसांत टँकर मंजूर करा, असे आदेश दिले.

कर्जतला खासगी टँकर कोणाचे ?

जिल्ह्यात 60 टँकर सुरू असताना कर्जत-जामखेडमध्ये मागणी असूनही एकही टँकर सुरू का केला नाही, असा जाब तहसीलदारांना विचारला. त्यावर तहसीलदार गप्प राहिले. टँकर सुरू करू नका, असे तुम्हाला कोणी सांगितले आहे का? असे आ. शिंदे म्हणाले. त्यावर तुमची बोलती बंद का झाली. तेथे कोणाचे फोटो लावून खासगी टँकर सुरू आहेत का? असे पालकमंत्र्यांनी सुनावले. पालकमंत्री व आ. शिंदे यांचा अप्रत्यक्ष रोख आ. रोहित पवार यांच्याकडे होता. मात्र, अधिकारी याला उत्तर देऊ शकले नाहीत. दोन दिवसांत मागणी असेल तेथे टँकर सुरू करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कांदा अनुदान 15 दिवसांत

जिल्ह्यात कांदा अनुदान अद्याप मिळाले नसल्याचे आ. शिंदे म्हणाले. यावर माहिती देताना जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी म्हणाले , जिल्ह्यातून कांदा अनुदानासाठी 2 लाख 55 हजार शेतकरी पात्र ठरले असून त्यासाठी 291 कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. येत्या 15 दिवसांत ते अनुदान येणाची शक्यता आहे.

संयुक्त समितीने टँकर मंजूर करावेत

जिल्ह्यात प्रत्येक महसूल मंडलात पर्जन्यमापक बसवण्यासाठी एक गुंठा जागा उपलब्ध करून द्यावी, टँकर मंजुरीसाठी प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांनी संयुक्त समिती स्थापन करून या समितीने तातडीने पाहणी करून पाण्याचे टँकर मंजूर करावेत, असे आदेश पालकमंत्री विखे यांनी बैठकीत दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या