दिल्ली । Delhi
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना हे चक्रीवादळ आज, किनारपट्टीवर धडकलंय. ओडीशामध्ये हे वादळ दाखल झालं असून, भुवनेश्वर जवळ या वादळाचं केंद्र आहे. सध्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये १०० ते १२० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे.
दाना चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर ओडिशातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. त्याचबरोबर जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग तुटले आहेत. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, किनारपट्टीच्या भागात आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दाना चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सर्व सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा प्रशासनाच्या पथके वादळग्रस्त भागात तैनात आहेत. खबरदारी म्हणून ओडिशातील १४ जिल्ह्यातील १० लाख लोकांना हलवण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये ३.५ लाख लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. वादळामुळे बंगाल आणि ओडिशामध्ये ३०० उड्डाणे आणि ५५२ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान दाना चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला किती धोका पोहोचणार याबद्दल सध्या नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं आधीच मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसणार का? असा प्रश्न पडत होता. मात्र, अद्यापतरी या वादळाचा महाराष्ट्राला कुठलाही धोका पोहोचणार नाही असं चित्र आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही भागात अधूनमधून हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याचं दिसून आला. परतीचा पाऊस महाराष्ट्रातून माघारी फिरलेला असला तरी, काही ठिकाणी राज्यात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. एकीकडे अरबी समुद्र आणि दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असल्यानं देशात सध्या पाऊस कोसळत आहे. त्यानंतर आज राज्यातही काही ठिकाणी तुरळक स्वरुपात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या २४ तासात राज्यात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.