Wednesday, May 29, 2024
Homeशब्दगंधगंगासागर बेट नष्ट होण्याचा धोका

गंगासागर बेट नष्ट होण्याचा धोका

– भास्कर खंडागळे

गंगा नदी अडीच हजार किलोमीटरहून अधिक प्रवाही क्षेत्रातच प्रदूषित झालेली नाही, तर बंगालच्या उपसागरात समुद्राला मिळते तिथेही तिच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हवामानबदलाचा सर्वाधिक फटका बंगालच्या उपसागराला बसत असून त्यामुळे गंगासागर बेट नष्ट होण्याची शक्यता वाढली आहे.

- Advertisement -

गंगासागर हे कोलकात्यापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सुंदरबन द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. या बेटाची लोकसंख्या वाढत असली तरी क्षेत्रफळ कमी होत आहे. त्याचा फटका संपूर्ण परिसराला बसला आहे. 1969 मध्ये गंगासागर बेटाचे क्षेत्रफळ 255 चौरस किलोमीटर होते, मात्र 2022 मध्ये त्याचे क्षेत्रफळ 224.30 चौरस किलोमीटर झाले. गेल्या 52 वर्षांमध्ये गंगासागरची 31 चौरस किलोमीटर जमीन समुद्रात बुडाली आहे. चेन्नईस्थित ‘नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट’ पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की, सुंदरबनमधील सुमारे 102 बेटांना धोका निर्माण झाला आहे. घोरमारा बेटावर धूप वाढल्यानंतर लोकसंख्या गंगासागरकडे स्थलांतरित होऊ लागली. शिकारीअभावी गोसाबा बेटावरील रॉयल बंगाल टायगर्स गावात घुसत आहेत. या बेटावरून पळून जाणार्‍या लोकांसाठी सागर बेट हे एकमेव आश्रयस्थान आहे. गंगासागर बेट हे सरकार आणि समाजाच्या देखरेखीखाली असल्याने येथे स्थायिक झाल्यास आपले प्राण वाचतील, असे लोकांना वाटते. मात्र बेटावर धूप वाढत आहे. 1437 मध्ये स्थापन झालेले कपिल मुनी मंदिर अनेक दशकांपूर्वी समुद्रात बुडाले होते. त्यानंतर 1970 च्या दशकात समुद्रापासून 20 किलोमीटर अंतरावर दुसरे मंदिर बांधले, त्याला जलसमाधी मिळाली. तिथल्या मूर्तीची नवीन मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली होती, पण त्या मंदिराचे समुद्रकिनार्‍यापासूनचे अंतर आता केवळ 300-350 मीटर राहिले आहे.

हिमनद्या वितळल्यामुळे तापमान वाढत असून समुद्राची पातळी वाढत असल्याने गंगासागरची जमीन सरकत आहे. येथील पाणीपातळीत दरवर्षी सरासरी 2.6 मिलीमीटर वाढ नोंदवण्यात आली आहे. पर्यावरणकेंद्रित आंतरराष्ट्रीय संशोधनपर वाहिलेल्या ‘जर्नल स्प्रिंगर नेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, सागर बेटाच्या दक्षिणेकडील सिबपूर-धबलत, बंकिमनगर-सुमतीनगर आणि बेगुआखली-महिष्मारी या दक्षिणेकडील भागात आणि संपूर्ण बेटाच्या 15.33 टक्के लोकसंख्येला उच्चश्रेणीचा धोका आहे. त्यांना मातीची तीव्र धूप आणि हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे.

गंगासागराच्या आजूबाजूची बेडफोर्ड, लोहाचारा, खासीमारा आणि सुपारीवांगा ही चार बेटे गेल्या काही दशकांमध्ये किनारपट्टीच्या धुपामुळे नाहीशी झाली आहेत. सागर बेटातील बिशालक्कीपूर भाग पाण्याखाली गेला असून अतिधूप झाल्याने सागर भागही राहण्यायोग्य राहिलेला नाही. घोरामारा बेटही लवकरच पाण्याखाली जाणार आहे. गंगासागरावर चक्रीवादळ वाढण्याचा धोका आहे. आयआयटी मद्रासच्या एका गटाने सरकारला सुचवले होते, की, गंगासागरभोवती सिमेंटचा बांध बांधला जावा. त्यामुळे तीन-चार दशकांपर्यंत जमिनीची धूप रोखता येईल. मात्र सरकारने ते मान्य केले नाही.

गंगासागरचा किनारी भाग अतिक्रमणमुक्त करून खारफुटीचा विस्तार करण्याची गरज आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे होणारे हवामानबदल वेळीच रोखले नाही तर जीवन देणारी गंगा पूर आणून विनाश करेल. ब्रिटनच्या एक्सेटर विद्यापीठाच्या संशोधकांच्या अहवालानुसार तापमानात दोन अंशांनी वाढ झाल्यास गंगेचा प्रवाह दुप्पट होईल. भारतातील लोकांसाठी जीवनदायी असलेल्या शुद्ध गंगाबाबत उत्तराखंडच्या ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी’ने मोठे संशोधन केले आहे. या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, भविष्यात हवामानबदल असाच चालू राहिल्यस गंगा नदीदेखील आक्रसण्याचा धोका आहे.

गंगा नदी देशाच्या जलसंपत्तीचे प्रतीक मानले जाते. जीवनरेखा असलेल्या त्याच गंगेचा जीव धोक्यात आला आहे. गंगोत्री हिमनदी वितळण्याचा वेग वाढत आहे. गंगोत्री हे गंगा नदीचे उगमस्थान आहे. गेल्या 87 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमनग घसरले आहेत. ते चिंताजनक आहे. 1935 ते 2022 पर्यंत गंगोत्री हिमनदीच्या तोंडाचा भाग सुमारे अडीच किलोमीटरपर्यंत वितळला आहे. उत्तराखंडमधील गंगोत्री ग्लेशियर ही हिमालयातील सर्वात मोठी हिमनदी आहे. 3,950 मीटर उंचीवर गायमुखच्या मुखाशी उगम पावणार्‍या या हिमनदीतील वितळलेले पाणी हा भगीरथी नदीचा प्रमुख स्त्रोत आहे. ही नदी देवप्रयाग येथे अलकनंदा नदीत जाऊन गंगा बनते. हिमालयात 9,575 हिमनद्या आहेत. त्यापैकी 968 एकट्या उत्तराखंडमध्ये आहेत. सध्या शास्त्रज्ञ आणि संशोधक राज्यातील गंगोत्री, चोराबारी, दुनागिरी, डोकरीयानी आणि पिंडारी आदी दोन डझनहून कमी हिमनद्यांचे निरीक्षण करत आहेत.

प्रामुख्याने हिमालयात जमा होणारा काळा कार्बन आणि तापमानात सतत होणारी वाढ यामुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत. तीन वर्षांपूर्वी ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात म्हटले आहे की, भारतासह संपूर्ण हिमालयीन प्रदेशात वाढत्या तापमानामुळे दरवर्षी सरासरी 0.25 मीटर हिमनद्या वितळत आहेत तर 2000 पासून दरवर्षी अर्धा मीटर हिमनद्या वितळत आहेत. या अभ्यासात भारत, चीन, नेपाळ आणि भूतान या हिमालयीन प्रदेशातील 40 वर्षांच्या उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण करण्यात आले. यासाठी संशोधकांनी सुमारे 650 हिमनगांच्या उपग्रह प्रतिमांचे पुनरावलोकन केले. हिमनद्या वितळण्याचे कारण म्हणजे हिमवर्षाव आणि तापमानात झालेली वाढ. या सर्व कारणांसाठी आपण सर्वजण कुठे तरी दोषी आहोत, कारण कार्बन फूटप्रिंट वाढत जाते तसतशी तापमानवाढ होते. त्यामुळे हवामानबदल होतो. ग्लोबल वॉर्मिंग दोन अंशांनी वाढले तर गंगा नदीचा प्रवाह दुप्पट होईल. पॅरिस हवामान करारानुसार ग्लोबल वॉर्मिंग 1.5 अंशापर्यंत थांबवता आल्यास परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात राहील; परंतु या शतकाच्या अखेरीस तापमानातील वाढ दोन अंशांपर्यंत पोहोचल्यास सुमारे 76 टक्के विकसनशील देशांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या