Sunday, September 8, 2024
Homeनगरदारणातून विसर्ग, गोदावरीत 2421 क्युसेकने पाणी सोडले

दारणातून विसर्ग, गोदावरीत 2421 क्युसेकने पाणी सोडले

धुव्वाधार पावसाने भावली फुल्ल! || नांदूरमधमेश्वरमधून पाणी सोडल्याने नदीकाठी सतर्कतेचा इशारा || कुकडी प्रकल्पात 27 टक्के पाणी

राहाता | Rahata

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे दारणा धरणात 78 टक्के पाणीसाठा झाल्याने काल बुधवारी या धरणातून 3746 क्ुयसेकने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. भावली ओव्हरफ्लो झाल्याने त्यांच्या सांडव्यावरून सुरूवातीला 73 क्युसेकने विसर्ग सुरू होता. तो रात्री 208 क्युसेक करण्यात आला. तर खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 2421 क्युसेकने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदी वाहती झाली आहे.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरी तालुक्यात पावसाचे धुव्वाधार आगमन झाले आहे. या पावसाने कालही घाटमाथ्यावर जोरदार बरसला. त्यामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली. काल बुधवारी सकाळी 11 वाजता दारणाचा साठा 75.81 टक्क्यांवर गेला. पाण्याची नवीन आवक पाहता जलसंपदा विभागाने दारणातून विसर्ग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दारणा धरणातील विद्युत प्रकल्पाच्या दरवाज्यातून 1100 क्युसेकने विसर्ग करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आवक वाढल्याने या धरणाच्या वक्राकार दरवाज्यातून दुपारी 3 वाजता 1874 क्युसेकने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. धरणात 5558 दलघफू म्हणजेच साडेपाच टीएमसी साठा झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यास सुरुवात झाली. दारणाच्या वरील भावली धरणही 4.30 वाजता ओव्हरफ्लो झाले. 100 टक्के भरल्यानंतर त्याच्या सांडव्यावरून 73 क्युसेकने विसर्ग सुरू झाला. भावलीचे हे पाणीही खाली दारणा नदीतून दारणा धरणाच्या दिशेने धावू लागल्याने काल सायंकाळी 6 वाजता दारणातून विसर्ग 624 क्युसेकने वाढवत तो 2498 क्युसेक इतका करण्यात आला. सायंकाळी 7 वाजता दारणाचा विसर्ग 1248 क्युसेकने वाढवत तो 3746 क्युसेक इतका करण्यात आला.

दारणाच्या पाणलोटात काल दिवसभर संततधार होती. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणात अर्धा टीएमसी पाण्याची आवक झाली. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 5558 दलघफू साठा झाला आहे. म्हणजेच सात टीएमसी च्या धरणात साडेपाच टीएमसी साठा काल सायंकाळपर्यंत झाला होता. काल सकाळी 6 च्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 34 मिमी, इगतपुरीला 73 मिमी, घोटीला 85 मिमी, भावलीला 86 मिमी पावसाची नोंद झाली. मुकणे धरण 22.56 टक्के (पाऊस 64 मिमी), वाकी धरण 22.56 टक्के (पाऊस 76 मिमी), भाम 79.34 टक्के (74 मिमी), भावली 100 टक्के (86 मिमी), वालदेवी 35.66 टक्के (43 मिमी).

खाली नांदूरमधमेश्वर बंधारा फुल्ल भरलेला असल्याने वरून दारणाचा विसर्ग दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून गोदावरी नदीत काल बुधवारी 4 वाजता 800 क्युसेकने विसर्ग करण्यास सुरुवात झाली. पाण्याची आवक पाहता हा विसर्ग काल सायंकाळी 7 वाजता 2420 क्युसेक इतका करण्यात आला. रात्रीतून हा विसर्ग स्थिर राहू शकतो. या विसर्गामुळे गोदावरी वाहती झाली आहे. दरम्यान,गोदावरी नदीत विसर्ग सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंधरा दिवसांपूर्वी गोदावरीत 255 दलघफू पाणी वाहून गेले. आता हा विसर्ग सलग राहू शकतो. त्यामुळे खाली जायकवाडीत पाण्याची आवक चार दिवसांनी सुरू होईल. गंगापूर समूहातील धरणांच्या पाणलोटातही दोन दिवसांपासून पावसाचे जोरदार आगमन होत आहे. काल सकाळी गंगापूरचा साठा 42.45 टक्क्यांवर पोहचला होता. या धरणाच्या पाणलोटात अंबोलीला काल सकाळी मागील 24 तासात 104 मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबकला 98 मिमी, गंगापूरला 56 मिमी, नाशिक ला 22 मिमी असा पाउस नोंदला गेला. त्यामुळे 5630 क्षमतेच्या या धरणात 2390 दलघफू पाणीसाठा झाला आहे. समुहातील कश्यपी 17.22 टक्के, गौतमी गोदावरी 42.56 टक्के, कडवा 63.45 टक्के, आळंदी 7.23 टक्के असा साठा आहे. कश्यपीला 55 मिमी, गौतमीला 62 मिमी, कडवा 25 मिमी, आळंदीला 24 मिमी अशी पावसाची 24 तासातील नोंद आहे.

गोदावरीचे कालवे वाहते !
मंगळवारी संध्याकाळी 9 वाजता गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना बिगरसिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरीचे दोन्ही कालवे वाहते झाले आहे. राहाता भागाकडे वाहणारा उजवा कालवा 300 क्युसेकने तर कोपरगावच्या दिशेने वाहाणारा डावा कालवा 200 क्युसेकने सोडण्यात आला आहे. गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होऊ शकेल.

कुकडी प्रकल्पात 27 टक्के पाणी; वडज 53, डिंभेत 40 टक्के भरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या कुकडी समूह धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस होत असल्याने सर्वच धरणांमध्ये हळू हळू नवीन पाण्याची आवक होत आहे. 664 दलघफू क्षमतेच्या वडज धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 53 टक्क्यांवर गेला आहे. तर या प्रकल्पातील सर्वात मोठे असलेले डिंभे धरण 40 टक्के भरले आहे.
काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 1375 दलघफू पाण्याची आवक झाली. या हंगामातील यंदाची विक्रमी आवक आहे. अजूनही पावसाचे प्रमाण टिकून असल्याने धरणांमध्ये पाणी येत आहे. काल सकाळी उपयुक्त पाणीसाठा 7568 दलघफू (25.50 टक्के) झाला होता. गतवर्षी या कुकडीतील पाणणीसाठा 8786 दलघफू (29.61टक्के) होता. मागील वर्षी काहीसे पाणी अधिक होते. पंधरा आठ दिवसांपूर्वी कुकडी प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा होता. पण गत आठ दिवसांपासून पाऊस होत असल्याने या प्रकल्पातील विविध धरणांत नवीन पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठा वाढत आहे.

आढळा 53 टक्क्यांवर
अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यांतील 20 गावांतील लाभक्षेत्राचे सिंचन करणार्‍या देवठाण येथील आढळा धरणातील पाणीसाठा 53 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. निम्मे भरले आहे. 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सकाळी 572 दलघफू (53 टक्के) झाला आहे. या पाणीसाठ्यामुळे लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. या धरणातील पाणीसाठा समाधानकारक झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या