Friday, October 18, 2024
Homeनगरगोदावरी दुथडी : 36 हजार 731 क्युसेकने विसर्ग

गोदावरी दुथडी : 36 हजार 731 क्युसेकने विसर्ग

पावसाची संततधार || दारणाचा विसर्ग 20 हजार क्युसेकवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणा, गंगापूर धरणांच्या पाणलोटात दोन दिवसांपासून पावसाची मुसळधार सुरु आहे. काल दिवसभर पावसाने घाटमाथा झोडपून काढला. पावसाच्या या स्थितीमुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक वाढत असल्याने काल दारणाचा विसर्ग 19972 क्युसेक करण्यात आला. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातूनही गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने काल सायंकाळी 8 वाजता 33576 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. रात्री 9 वाजता हा विसर्ग 36 हजार 731 क्युसेक इतका करण्यात आला होता. दरम्यान या मुसळधार पावसाने भावलीचा विसर्ग 1821 क्युसेकने सांडव्यावरुन पडत आहे. कडवाचा विसर्गही 8298 क्युसेक ने सोडण्यात येत होता तर भाम मधून 5920 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तसेच पालखेड धरणातूनही 2345 क्युसेकने विसर्ग सुरु झाला आहे. या विसर्गामुळे गोदावरी नदीत जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होवू शकतो.

- Advertisement -

काल सकाळी 6 वाजता दारणातून 4735 क्युसेकने विसर्ग सुरु होता. हा विसर्ग नंतर दोन तासांनी 2003 क्युसेकने वाढवत तो 6738 क्युसेकवर नेण्यात आला. दारणा धरणाची पाण्याची पातळी राखुन नवीन येणारे पाणी सहा वक्राकार दरवाज्यातून सोडणे सुरु आहे. यासाठी हे दोन दोन फुटांनी दरवाजे उचलण्यात आले आहे. तासाभरात पुन्हा या विसर्गात 2596 क्युसेकने वाढ करत तो 9334 क्युसेकवर नेण्यात आला. तासागणिक वाढवत पुन्हा तो दुपारी 4 वाजता 19972 क्युसेकवर नेण्यात आला. दारणाचा उपयुक्तसाठा 85.51 टक्के स्थिर ठेवून उर्वरित नवीन येणार्‍या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर धरण काल सायंकाळी 6 वाजता 72.50 टक्के भरले होते. पावसाची संततधार सुरु राहिल्यास या धरणातूनही दोन दिवसात विसर्ग सुरु होवू शकतो. 78 टक्के साठा झाल्यावर या धरणातून विसर्ग सोडण्यात येणार आहे. काल सकाळी 6 वाजता या धरणातील उपयुक्तसाठा 69.15 टक्के इतका होता. काल शनिवारच्या दिवसभरातील पावसाने हा साठा 72.50 टक्क्यांवर गेला आहे.

दारणातून 20 हजार क्युसेक, कडवातून 8298 क्युसेक, पालखेड मधून 2345 क्युसेक, तसेच निफाड व नाशिक शहरातील गोदावरीचे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने काल सायंकाळी 7 वाजता गोदावरीत 33 हजार 576 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. त्यामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. काल सकाळी 6 वाजता 1 जून पासून या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 4.7 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. जायकवाडीत काल सायंकाळी 6 वाजता 3694 क्युसेकने पाणी जलाशयात सामावत होते. या धरणात उपयुक्तसाठा 10.12 टक्के झाला होता. म्हणजेच 7.75 टिएमसी पाणी उपयुक्तसाठ्यात आहे. तर मृतसह एकूण साठा 33.83 टिएमसी इतका झाला आहे. नाशिक च्या धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे दोन दिवसात जायकवाडी जलाशयात नवीन पाण्याची चांगली आवक होवू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या