Friday, May 3, 2024
Homeनगरदारणा, गंगापूरच्या पाणलोटात पावसाला जोर नाही

दारणा, गंगापूरच्या पाणलोटात पावसाला जोर नाही

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाला हवा तसा वेग नसल्याने भावली वगळता अन्य धरणांमध्ये नविन पाण्याची आवक अद्यापही झालीच नाही. इगतपुरी, घोटी परिसरात पावसाचे अधूममधून आगमन होत असले तरी धरणक्षेत्र मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

- Advertisement -

जून महिन्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. धरणामध्ये नवीन पाणी सामावेल अशी या सरींची अवस्था नव्हती. आता जुलै सुरू होऊनही पावसाचे फक्त मध्यम ते हलक्या स्वरुपाचे आगमन होत असल्याने नवीन पाण्याची आवक होत नाही. त्यामुळे धरणांचा परिसर, पाणलोट क्षेत्र संततधार आणि मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

मुंबईत पाऊस सुरू आहे. दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी भागापर्यंत पाऊस आला असला तरी तो केवळ 10 किमीच्या परिघात पडतो आहे. तोही मध्यम स्वरुपाचा असल्याने घाटमाथ्यावरून पाणी छोटे छोटे बंधारे, खाचरे यात साठले जात आहे. हे पाणी अद्यापही धरणांकडे झेपावलेले नाही. त्यामुळे या हंगामात दारणा, गंगापूर धरणांमध्ये नवीन पाणी दाखल झालेले नाही.

यंदा जून महिन्यात पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्याने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात वर्तविलेल्या दमदार पावसावरच या धरणांची मदार आहे. मान्सूनमध्ये तुर्तास फारसा जोर नाही. मात्र धरण क्षेत्रात मान्सून अडकल्याने तो टिकून राहू शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.

काल दिवसभर दारणा, गंगापूरच्या पाणलोटात पावसाची रिपरिप सुरू होती. काल सोमवारी सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत दारणाच्या पाणलोटात 15 मिमी (एकूण 190 मिमी), भावली 81 मिमी (एकूण 703 मिमी), वालदेवी 3 मिमी (एकूण 15 मिमी), गंगापूर 9 मिमी (एकूण 249 मिमी), कश्यपी 4 मिमी (एकूण 126 मिमी), गौतमी गोदावरी 7 मिमी (एकूण 146 मिमी), कडवा 9 मिमी (एकूण 164 मिमी), आळंदी 3 मिमी (84 मिमी), पालखेड 2 मिमी (एकूण 99 मिमी).

गंगापूरच्या पाणलोटातील अंबोली येथे 19 मिमी (एकूण 261 मिमी), त्र्यंबक 14 मिमी (एकूण 164 मिमी), नाशिक 3 मिमी (एकूण 102 मिमी), नांदूरमधमेश्वर 6 मिमी (एकूण 105 मिमी).

अपेक्षेप्रमाणे घाटमाथ्यावर मान्सूनची मध्यम स्वरुपात बरसात सुरू झाली आहे. घाटमाथा वगळता अन्य ठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या अंतिम चरणात मध्यम प्रमाणात मान्सूनचे आगमन होईल. मान्सूनचा खरा जोर हा 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान असेल. तोपर्यंत उगवण झालेल्या पिकांना कमी ते मध्यम स्वरुपातील पावसाने जीवनदान मिळेल, अशी आशा आहे.

लाभक्षेत्रात भीज पाऊस !

दरम्यान गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील राहाता, कोपरगाव तालुक्यात काल दुपारनंतर भीज पाऊस झाला. या तालुक्यात खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. कालच्या पावसाने त्यात खंड पडणार आहे. पावसाचे प्रमाण संमिश्र असल्याने काही ठिकाणी अद्यापही पेरण्या नाहीत. मात्र ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या त्या पिकांची उगवण होण्यासाठी या पावसाचा उपयोग होणार आहे. या पावसाने ओल काही प्रमाणात खाली गेल्याने पिकांना मदत होईल. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रालाही मुसळधार पावसाची गरज आहे. मध्यम स्वरुपाचे पाऊस बरसले आहेत. जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी या पावसांची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या