राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर घोटी, इगतपुरी परिसरात अधून मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून दारणा धरणात नवीन पाण्याची आवक सुरु झाली आहे. भावलीतही नवीन पाण्याची आवक सुरु झाली आहे. घोटी, इगतपुरी परिसरात तीन दिवसांपासून अधून मधून पावसाचे जोरदार आगमन होत आहे. रविवारी उशिरा दारणा धरणात नवीन पाण्याची आवक सुरु झाली आहे. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात दारणाच्या भिंतीजवळ 40 मिमी पावसाची नोंद झाली.
मुकणे 42 मिमी, वाकी 83 मिमी, भाम 47 मिमी, भावली 102 मिमी, गंगापूर 80 मिमी, कश्यपी 72 मिमी, गौतमी गोदावरी 79 मिमी, कडवा 13 मिमी, आळंदी 55 मिमी, पालखेड 28 मिमी, त्र्यंबक 83 मिमी, आंबोली 115 मिमी असा पाऊस नोंदला आहे. घोटी, इगतपुरी, भावली परिसरातील घाटमाथ्यावरून वाहणार्या झरे पाहिजे त्या वेगाने सुरु नाहीत. मात्र अधूनमधून येणार्या जोरदार पावसामुळे छोट्या मोठ्या नद्या, ओढे वाहू लागले आहेत. धरणात पाण्याची आवक सुरु झाली आहे. नांदूर मधमेश्वर बांधार्याच्या पाणलोटात अधून मधून पाऊस पडत असल्याने या बांधार्याची पाणी पातळी राखून या बांधार्यातून 100 क्युसेक ने विसर्ग गोदावरीत सोडला जात आहे. हा विसर्ग आठ दिवसापासून सुरु आहे.