सत्ताधार्यांच्या काळात गावासमोर अडचणींचा डोंगर उभा – निकम
टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar
सत्ताधार्यांनी पाच वर्षे एकहाती सत्ता वापरून लोकांचे प्रश्न टेबलाखाली दाबून ठेवले. सत्ताधारी ग्रामपंचायत स्थापनेपासून सत्ता भोगत असून देखील, गावासमोर अडचणींचा डोंगर उभा असल्याचा आरोप नानासाहेब शिंदे गटाचे माजी सरपंच पी.एस.निकम यांनी केला.
राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने लवकरच दत्तनगर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात शासनाकडे मागणी केल्याप्रमाणे घरकुल व इतर योजनेसाठी जागा उपलब्ध होत असून, ज्यांना गावाला गावठाण मिळवता आले नाही, ते आज सत्तेतून पायउतार होणार असल्याचे लक्षात येताच निराशेपोटी जनतेची दिशाभूल करत आहे. सत्ताधार्यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा अवघ्या 5 कोटींचा आराखडा तयार केला. हे आमच्या लक्षात येताच आम्ही अधिकार्यांना सोबत घेऊन गावाचा फेरसर्व्हे करून आराखडा बदलत 5 कोटींची योजना 29 कोटी पर्यंत नेली. याकामी ना. विखे व नानासाहेब शिंदे यांचे योगदान लाभले.
त्यामध्ये गांवातर्गत व गावाला जोडणार्या रस्त्यांची दुरवस्था, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शौचालयांचा प्रश्न, घरकुल, दर्जेदार शिक्षण सुविधेचा अभाव, शाश्वत रोजगाराचा अभाव, दळण- वळण सुविधांचा अभाव. अपुरी, अनियमित वीज यासारखे बलाढ्य प्रश्न गावाभोवती फिरत असल्याचे ते म्हणाले.
विखे गट ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे – शिरसाठ
टिळकनगर |वार्ताहर|Tilaknagar
विखे गट दत्तनगर गावठाण जागेसंदर्भात चुकीची माहिती देऊन ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करत आहे, असे मत ससाणे गटाचे माजी सरपंच सुनील शिरसाठ यांनी व्यक्त केले.
जेथे लोक स्लॅबचे घर बांधून राहतात तेथे गावठाण करू, असे खोटारडे बोलत आहे. विरोधकांना फक्त गरीब जनतेकडून पैसे गोळा करून त्यांना मोठे स्वप्न दाखवण्याचा दुर्दैवी खेळ खेळत आहे. त्यांचा धंदाच तो आहे. कुठल्याही प्रकारचे गावठाण मंजूर नसून गावठाण जागा गावाजवळ कुठेही शिल्लक नसल्याचे शिरसाठ म्हणाले, फक्त निवडणुकीत मोठ्या गप्पा मारायच्या व निघून जायचे असा विरोधकांचा प्रकार आहे.
विरोधकांना तालुक्याचे मोठे पद भोगून देखील दत्तनगर गावासाठी अद्यापही एकही योजना आणता आली नाही. आणली असेल तर जाहीर करावे, विरोधक ज्या भागातून ग्रामपंचायत सदस्य झाले, त्या भागात सुध्दा एकही योजना विरोधकांना आणता आली नाही. फक्त मोठमोठ्या गप्पा मारायच्या व लोकांना झुलवत ठेवायची कामे त्यांच्याकडून वारंवार होत राहिली, विरोधकांकडून सध्या सरपंच पदाचे जे उमेदवार आहे त्यांना अद्यापही सदस्य सुद्धा होता आले नाही. ते आज चुकीचा आरोप करत असल्याचे सुनील शिरसाठ म्हणाले.
सत्ताधार्यांकडून मतदारांची दिशाभूल – क्षीरसागर
टिळकनगर |वार्ताहर|Tilaknagar
दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या विरोधातील दोन्ही गट सन 2007 पासून एकत्रित सत्ता भोगत आहेत. आता सत्तास्थानी येण्यासाठी एकमेकांविरोधात उभे ठाकून मतदारांची दिशाभूल करत आहे. दोन्ही गट एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा दावा वंचित आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार योगीता क्षीरसागर यांनी केला आहे. तालुक्याच्या राजकारणात नको त्याठिकाणी विखे, मुरकुटे, ससाणे एकत्रितपणे येऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर पुन्हा संघटनेत एकमत न झाल्याने काही ठिकाणी अलिप्त झाले.
मात्र, कार्यकर्ते वार्यावर सोडले गेले. स्थानिक निवडणुकीत आपापल्या गटाचे वर्चस्व रहावे म्हणून कार्यकर्त्यांची फळी तयार करून गावागावांत एकमेकांविरोधात उभे ठाकले असून, दत्तनगर ग्रामपंचायतीच्या या दोन्ही गटाने गावाचा विकास केला नाही. जनतेच्या मूळ प्रश्नाला बगल देऊन अनेक शासकीय योजना प्रत्यक्षात राबविता आल्या नाही. गेले अनेक वर्षे सत्ताधार्यांनी सत्तेचा दुरूपयोग केला असल्याचा आरोप सौ.क्षीरसागर केला.