नाशिक | Nashik
महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला दहा वेळा वेश बदलून गेले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याला खुद्द अजित पवारांनी उत्तर दिले आहे. त्यांनी हे आरोप सिद्ध करावेत. जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी. हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन असे मोठे विधान करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
‘मी वेषांतर करुन कुठेही गेलो नाही, वेषांतर करुन गेलो हे साफ खोटे आहे, आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन. फेक नॅरेटिव्ह सेट केला जात आहे. मी लपून छपून जाणार नाही, उघड माथ्याने जाईन. मी नाव बदलून कधीच प्रवास केला नाही. वेश बदलून दिल्लीत गेलो असतो तर संसदेत तपासावे. वेषांतराचा आरोप सिद्ध न झाल्यास तुम्ही संन्यास घ्या’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
माझ्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरु आहे. आरोप करण्याआधी माहिती घ्या. मी ३५ वर्ष विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री आणि मंत्री, आमदार म्हणून जबाबदारी मलाही कळते. नाव बदलून प्रवास करणे हा गुन्हा आहे. सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. खुशाल कुणी बहुरुपी म्हणतेय आणखी कुणी काही म्हणतेय. म्हणणाऱ्यांना काही लाजलज्जा शरम वाटली पाहिजे. धादांत बिनबुडाचे आरोप केले जातायेत त्यात काहीही सत्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचसोबत सकाळी ९ वाजता भोंगा लागतो, अजित पवारांनी असं केले वैगेरे, उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला. तुम्हाला कुठे पुरावा मिळाला, नाव बदलले, मी कुठेही गेलो तरी राज्याचा विरोधी पक्षनेता होतो. मी टोपी घातली होती, मिशा लावल्या होत्या, मास्क घातला होता. साफ चुकीचे आहे. जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईन. जर नाही सिद्ध झालं तर ज्या लोकांनी संसदेपासून इथपर्यंत जी नौटंकी लावली त्यांना थोडी जनाची नाही तरी मनाची वाटायला हवी होती. कुणीतरी चॅनेलवर बातमी लावते, त्या बातमीचा कुठे पुरावा नाही, त्याला आधार नाही. कॅमेऱ्यात काही व्हिडिओ नाहीत. माझी बदनामी करण्यासाठी हे सुरू आहे असे सांगत अजित पवारांनी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा