मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील (Pune) कोरेगाव पार्क येथील ४० एकर १८०० कोटी रुपये किंमत असलेली जमीन ३०० कोटी रुपयांत विकल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच या व्यवहारात तब्बल २५ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली असून,केवळ ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश देत पुण्याच्या तहसीलदारांना निलंबित केले आहे. दुसरीकडे यावरून विरोधकांकडून पार्थ पवार यांच्यासह अजित पवारांवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर अजित पवारांनी मौन सोडले आहे.
यावेळी ते म्हणाले, “चॅनलमध्ये जमिनीबाबत वेगवेगळी माहिती सांगितली जात आहे. नेमका प्रकार काय आहे त्याची सविस्तर माहिती मी घेणार आहे. काय घडलं, काय नाही, कुणी परवानगी घेतली याची माहिती घेतो. माझा त्या व्यवहाराशी दुरान्वये संबंध नाही.मागील तीन ते चार महिन्यांपूर्वीही अशा गोष्टीचं काहीतरी चालल्याचे कानावर आले. त्यावेळेसच मी सांगितलं की, असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या चुकीच्या गोष्टी कुणीही करू नका अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या, परंतु त्यानंतर काय झालं ते मला माहिती नाही. मी आजपर्यंत कुठल्याही जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकाला कुठेही त्यांना फायदा होण्याकरता एकाही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही किंवा कधी काही सांगितलेलं नाही”, असं अजित पवारांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “मी उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगेल की, जर माझ्या नावाचा वापर करुन कुणी चुकीचे करत असेल, नियमात न बसणारे करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल. मी कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे.मुख्यमंत्री म्हणाले की, चौकशी करतो. त्यांनी जरुर चौकशी करावी. तो त्यांचा अधिकार आहे. जर उद्या कुठल्याही बाबतीत कुणी तक्रार केली तर चौकशी करावी. हे सरकारचं कामच आहे”, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.




