मुंबई | Mumbai
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rains) राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचे (Farmer) अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्याची मागणी होत आहे. तर आज (बुधवारी) सर्वच मंत्र्यांचे पाय शेतकऱ्यांच्या बांधाकडे वळले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार (Dcm Ajit Pawar) यांनी आज सोलापुर जिल्ह्यातील गावांतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोलापूरच्या (Solapur) पूरपरिस्थितीचा पाहणी दौऱ्याला सकाळी (२४ सप्टेंबर) सुरूवात केली. यावेळी त्यांनी करमाळा तालुक्यातील कोर्टी याठिकाणी नासाडी झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
यावेळी सोलापुराच्या करमाळा तालुक्यातील (Karmala Taluka) कोरटी गावात अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांनी काळजी करू नये. निधीची कोणतीही चिंता नाही. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल आणि मदत देताना ६५ मिमी पावसाची अट ठेवणार नाही”, असे विधान त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते सर्व आम्ही करू. आधी आम्ही पाहणी करत आहोत आणि तुमच्याकडून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत आहोत, असे आश्वासनही अजित पवारांनी दिले.
यावेळी अजित पवार यांनी सोलापुरातील सीना नदीकाठच्या गावांची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, १४ सप्टेंबरनंतरच्या नुकसानीचे पंचनामे आल्यावर मदत मिळणार आहे. आम्ही लवकरात लवकर मदत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत आम्ही माहिती घेऊन मदत देणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी आणि कळंब परिसरात झालेल्या अतिवृष्टीची देखील अजित पवारांनी पाहणी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२१५ कोटी रुपये मंजूर
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून २२१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (मंगळवारी) केली होती. पुढील ८ ते १० दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितले. ओला दुष्काळच काय तर ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या ठिकाणी पाहिजे ती मदत देणार असल्याचीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.





