मुंबई | Mumbai
बदलापूर (Badlapur) पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर (Girl) झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर गेल्या आठ तासांपासून हजारो बदलापूरकर नागरिकांचे रेल्वे रुळावर उतरून आंदोलन सुरु आहे. यावेळी आंदोलकांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) बदलापूरमध्ये दाखल झाले होते. मात्र, आंदोलकांची समजूत काढण्यात त्यांना यश आले नाही.
हे देखील वाचा : Badlapur School Case : लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आरोपींना…”
तर दुसरीकडे आंदोलकांकडून (Protesters) आरोपीला (Accused) फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई केली गेली, असा आरोपही आंदोलकांनी केला आहे. अशातच आता याप्रकरणी राज्य सरकारने (State Government) पहिली कारवाई केली असून तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन (Suspended) केले आहे.
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. बदलापूरच्या घटनेत सुरुवातीला कारवाई करण्यात तसेच गुन्हा नोंदवण्यास विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Badlapur School Case : बदलापुरात आंदोलनाला हिंसक वळण; नागरिकांकडून शाळेची तोडफोड
दरम्यान, तत्पूर्वी याप्रकरणाच्या चौकशीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश दिले असल्याची माहितीही त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली होती. तसेच फडणवीस यांच्या कार्यालयाकडून बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, असे सांगण्यात आले होते. याशिवाय हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचे निर्देशही ठाणे पोलीस आयुक्तांना (Thane Police CP) दिल्याचे त्यांनी म्हटले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा