Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEkanath Shinde: "संकट मोठे त्यामुळे मदत करताना…"; शेतकऱ्यांबाबत बोलताना एकनाथ शिंदे काय...

Ekanath Shinde: “संकट मोठे त्यामुळे मदत करताना…”; शेतकऱ्यांबाबत बोलताना एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुंबई | Mumbai
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असून सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी दौरा करून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाऊले उचलत आहे. मंत्र्यांसह नेते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत. ‘सरकार शेतकऱ्यांसोबत असून त्यांना तातडीने मदत केली जाईल. पुढच्या दोन दिवसांत सरकार शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेईल.’, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती अद्याप तशीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागात भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांवर आलेले संकट खूप मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी बोलताना त्यांच्या वेदना जाणवर होत्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये अशाप्रकारची पूरपरिस्थिती आणि असा पाऊस कधीही पडला नाही. हे संकट मोठे आहे आणि या संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. प्रत्येक आपत्तीवेळी सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलेले आहे. त्यामुळे सर्व मुद्द्यांवर आजच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

मदत करताना हात आखडता घेणार नाही
संकट मोठे आहे त्यामुळे मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. जवळपास ६० लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. पुढील २ दिवसांत संपूर्ण नुकसानीचे आकडे येतील.’ त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करताना अटी, शर्थी आणि नियम बाजुला ठेवून त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, अशी आमच्या सर्वांची भावना आहे. जेव्हा-जेव्हा अशी मोठी अतिवृष्टी होते, मोठे संकट येते, त्या-त्या वेळेत मदत करणे ही सरकारची जबाबदारी व कर्तव्य आहे. नुकसानीची संपूर्ण माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेऊ. नियम, अटी आणि शर्ती बाजुला ठेवण्याचा निर्णय यापूर्वी देखील सरकारने घेतला होता, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

YouTube video player

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
याआधीही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले आहे. आता आलेल्या संकटात पिकाचे नुकसान झाले. जमीन वाहून गेली आहे. पशूधनाचे मोठे नुकसान झालेय. घरे पडली आहेत. जिवितहानी झाली आहे. पाऊस थांबलाय पण नदीच्या प्रवाहामुळे काही घरे पाण्याखाली आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.’

राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील
तसेच, ‘अशा परिस्थितीमध्ये आम्ही केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिघांच्या सहीचे पत्र मोदींना पाठवले आहे. केंद्र सरकार, मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अनेक योजना केंद्र अन् राज्याने केल्या आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील, याची ग्वाही देतो. शेतकऱ्यांना मदत करणे सर्वांचे आपले कर्तव्य आहे. सरकार मदत करणार आणि शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार. सर्वांनी शेतकऱ्यांसाठी जी मदत करता येईल ती करावी. शेतकऱ्यांना तात्काळ जीवनआवश्यक वस्तू देण्याची गरज आहे. त्यासाठी गहू, तांदूळ अन् १० हजार देण्याची सुरूवात झाली आहे. सत्ताधारी, विरोधक यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. मुलांची पुस्तके, वह्या वाहून गेली आहेत. आम्ही गेल्या आठवड्यापासून मदत पाठवण्याचे सुरूवात केली. त्या भागात लोक शेतकऱ्यांना मदत पोहचवत आहेत. शेवटच्या शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत मदत सुरू राहणार आहे.’, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या