मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरु आहे. या घडामोडींमध्येच एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी म्हणजेच ९ जुलै २०२५ रोजी दिल्लीचा दौरा केल्याची माहिती समजत आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या दिल्लीत भेटी घेतल्याचे समजत आहे. या भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा काही घडणार का असा कयास बांधला जात आहे.
सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्लीची वारी केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे. दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. दरम्यान नियोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे. तर या दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र या मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
समजलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ही भेट गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात असले तरी मात्र अद्याप याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशा उच्चस्तरीय भेटीगाठी नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असतात. त्यात सध्या राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असताना आणि अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जात असताना हा दिल्ली दौरा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपले अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले आणि त्याऐवजी उदय सामंत किंवा इतर नेत्यांना पाठवले होते. सुनील प्रभू यांच्यासह 50 नेत्यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. या भेटीगाठी आणि अचानक केलेल्या दिल्ली दौऱ्यामागचं कारण स्पष्ट होणं बाकी आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




