मुंबई | Mumbai
शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (शुक्रवार, 23 जानेवारी) 100 वी जयंती आहे. या निमित्ताने राज्यभरात शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. तर, राज्य सरकारच्याही वतीने हे वर्ष ‘बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी राबवण्यात येणाऱ्या योजनांची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी केडीएमसीत मनसेने दिलेल्या पाठिंब्याबाबत सविस्तर माहिती दिली.
नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यादरम्यान बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, महापालिका निवडणुकीत भाजपानंतर शिवसेना दुसऱ्या नंबरचा मोठा पक्ष ठरला. चांदा ते बांदा शिवसेना घराघरापर्यंत पोहोचली आहे. बाळासाहेबांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर उभारणे पाहिजे आणि जम्मू काश्मीरमध्ये 302 कलम हटवले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे दोन्ही स्वप्न पूर्ण केली आहेत. शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं. यादरम्यान बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आज दावोसमध्ये आहेत. मी त्यांचे अभिनंदन केले आहे. बाळासाहेब ठाकरे हे कार्यकर्त्यांना मोठे करणारे नेते होते. आरोग्य आपल्या दारी अशाप्रकारचे अभियान आम्ही राबवत आहोत.
त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर अत्याचार
कल्याण डोंबिवलीत काय घडलं?
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिंदे गटाचे 53 आणि भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत कोणाचा महापौर बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली असतानाच एकनाथ शिंदे यांनी मनसेला सोबत घेऊन डाव साधला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केडीएमसीत मनसेचा पाठिंबा का घेतला, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.
मनसेच्या पाठिंब्याचे स्वागत करतो
कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेची युती आहे. आम्ही युतीत निवडणुका लढलो. तेथे मनसेने विकासाच्या मुद्द्यांवर आम्हाला पाठिंबा दिला. आम्ही मनसेचे स्वागत करतो. मनसे उमेदवारांच्या वॉर्डमधील समस्या आम्ही नक्की सोडवू. मनसेचा जो विकासाचा अजेंडा आहे, तो आम्ही पूर्ण करु, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या लवचिक धोरणाचे समर्थन करतो
यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या लवचिक राजकीय धोरणाचेही समर्थन केले. मी राज ठाकरे यांचे ट्विट पाहिले. मी वैयक्तिक स्वार्थासाठी निर्णय घेणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी कधीही स्वार्थ पाहिला नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळीही त्यांनी अशीच भूमिका घेत महायुतीला पाठिंबा दिला होता. राज ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करतात, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांच्या आम्ही विरोधात
जे कोणी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जातो असं सांगतात, वारसदार आहे म्हणून सांगतात त्यांना मी विनंती करतो, हे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे. इथेच तुमची बाळासाहेबांवर खरी श्रद्धा आहे का? बाळासाहेबांसमोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का? तुम्ही बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता का? जर श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता तर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले होते. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांच्या आम्ही विरोधात आहोत. त्यासाठीच आम्ही त्यांच्याविरोधात जाऊन 2022 मध्ये सरकार बनवले. भाजप आणि शिवसेनेची युती ही बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासूनची आहे, असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.




