मुंबई | Mumbai
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा होती. या नाराजीचे कारण म्हणजे भाजपा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचे राजकारण. त्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहे अशा जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट देखील घेतली होती.
दरम्यान, महायुतीमधील या नाराजी नाट्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर खुलासा करत भूमिका मांडली आहे. तसेच ‘जे होतं ते आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या मनाने बोललो’, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
या मुलाखतीत बोलताना एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील कथित नाराजीनाट्यावर भाष्य केले. मी प्रचार करतोय. देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रचार करत आहेत. आम्ही प्रचारात आघाडीवर आहोत. काही ठिकाणी आमची भाजपाशी युती आहे, काही ठिकाणी अजितदादा यांच्याशी युती आहे. लोकांना स्थानिक पातळीवरील विकास पाहिजे. मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने, विकासात्मक प्रचार करायचा, असे आम्ही ठरवलेले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
महायुतीतील फोडाफोडीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती का? असा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले की, “जे होतं ते आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या मनाने बोललो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर फडणवीसांनी आम्हाला सांगितलं की मी आमच्या (भाजपाच्या) पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना देईल की आपल्या युतीमध्ये कुठेही गालबोट लागता कामा नये. आपली युती अभेद्य राहिली पाहिजे”, असे शिंदेंनी म्हटले. तसेच दोन्ही पक्षांनी त्याबाबतची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही शिंदेंनी यावेळी व्यक्त केली.
मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश द्यायचा नाही
शिवसेनेचे पदाधिकारी, नेते यांचा होत असलेला भाजपा प्रवेश यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. यावर माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. काही ठिकाणी समीकरणे पाहता मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे की, आपण मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पक्षात घेऊ नये. मीदेखील महायुतीत मतभेद निर्माण होतील, असे काहीही करू नये, असे माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेय अशी माहिती शिंदे यांनी दिली. एका ठिकाणी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार होते. त्यामुळे हे प्रवेश करणारे भाजपातील तर नाहीत ना रे बाबा, असे आवर्जुन विचारले. मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शिवसेनेत प्रवेश द्यायचा नाही, असे माझ्या पक्षाच्या लोकांना सांगितल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दिल्लीत अमित शहांकडे तक्रार करण्याचा विषय नसतो
दिल्ली दौऱ्यात अमित शाह यांच्याबरोबर नेमके काय चर्चा झाली? याबाबत एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. ‘दिल्लीला जाणे आणि मग तिकडे कोणाची तक्रार करणे असा काही विषय नसतो’, असे म्हणत तक्रार केल्याच्या चर्चा शिंदेंनी फेटाळून लावल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




