अहमदनगर (प्रतिनिधी)
टिव्ही केबलमध्ये (TV Cable) हायव्होल्टेज वीजप्रवाह (High voltage current) उतरल्याने धक्का लागून एका खेळाडूचा मृत्यू झाला, असा दावा करत केबलच्या गैर प्रकाराकडे दुर्लक्ष करणारे महापालिका व महावितरणच्या (Municipal Corporation and MSEDCL) अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे जागरूक नागरिक मंचने म्हटले आहे. याबाबत मंचचे डॉ.सुहास मुळे यांनी माध्यमांना माहिती दिली.
ही घटना 1 रोजी सायंकाळी साईनगर (Sainagar) विनायक नगर (Vinayak Nagar) परिसरात घडली. अजिंक्य सुरेश गायकवाड (वय 28) हा घरात आलेली टिव्ही केबल व्यवस्थित जोडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या केबलमध्ये वीजप्रवाह उतरलेला असल्याने धक्का बसून काही क्षणात त्याचा मृत्यू झाला. अजिंक्य हा प्रसिद्ध गोळाफेकपटू होता. त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचे चिरंजीव व जागरूक नागरिक मंचचे सदस्य दत्ता गायकवाड यांचा तो पुतण्या आहे. यानंतर कोणत्याही यंत्रणेने या घटनेची नोंद घेतली नाही.
घटनेनंतर सुहास मुळे, दत्ता गायकवाड व मकरंद घोडके घटनास्थळ व परिसराची पाहणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. टिव्ही केबलमध्ये 4400 होल्ट इतका करंट उतरलेला होता. सदरची केबल हाय टेन्शन लाईनवरून जम्पिंगकरून आणि पॅरलल पद्धतीने घरोघरी पोहोचवण्यात आलेली आहे. हा प्रकार बेकायदेशीर असून संपूर्ण शहरामध्ये अशा प्रकारच्या केबल महावितरणच्या खांबावरून, महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईटचा आधार घेत करंट वाहणार्या तारांना चिकटून घरोघर पोहोचलेल्या आहेत. याकडे महानगरपालिका व महावितरणच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळेच गायकवाड परिवारावर दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. संबंधित सर्व अधिकार्यांवर वैयक्तिक रित्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जागरूक नागरिक मंचने माध्यमांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आठ दिवसात संपूर्ण नगर शहरातील विद्युत खांबावरून आणि हायव्होल्टेज तारांना चिटकून घरोघर पोचवण्यात आलेल्या बेकायदेशीर व अतिधोकादायक टिव्ही केबलचे जाळे संबंधित अधिकार्यांनी काढले नाही तर कामात कुचराई केल्याचे गुन्हे दाखल करणार आहोत, असे मुळे यांनी म्हटले आहे.