मुंबई | Mumbai
राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, बड्या नेत्यांना धमक्यांचे सत्र हे भीती वाढविणारे ठरत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी फोन आला होता. ही घटना ताजी असताना आता भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, शेलार यांना पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली असून त्यात म्हटले आहे की,,हातपाय तोडणार, चौपाटीमध्ये फेकून देणार, कुटुंबीयांनाही संपवणार असा आशय या धमकीच्या पत्रात नमूद करण्यात आला आहे.
दरम्यान, आज सकाळी टपालमध्ये (Post) सापडलेल्या पत्रात शेलारांना ही धमकी आढळून आली असून त्यांनतर आशिष शेलार यांनी बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दिली आहे. तसेच धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात पोलिसांकडून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून बांद्रा पोलिसांनी (Police) तपास सुरू केला आहे.