नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळ सोमवारी सायंकाळी मोठा स्फोट झाला. यामध्ये आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहे. हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हंटले जात आहे. या हल्ल्यातील दहशतवादी उमर मुहम्मदचा पहिला फोटो समोर आला आहे. स्फोट झाला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यावरुन डॉ. उमर नबी यामध्ये सहभागी असल्याचे दिसतय. घटनास्थळी एक तुटलेला हात सापडला, तो डॉ. उमरचा असल्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाल किला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी उमर मोहम्मद हा जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहे. स्फोटाच्या वेळी उमर हा कारमध्ये एकटाच होता. या दहशतवादी कटामागील घटनांक्रम समोर येईल. तपास यंत्रणाकडून उमर याच्या हालचाली अन् संपर्क कुठे कुठे केला? याची संपूर्ण चौकशी कऱण्यात येत आहे.
या स्फोटाबाबत पोलिसांनी सांगितले की उमर हा फरिदाबाद मॉड्यूलचा भाग असू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचे छापे सुरू आहेत, ज्यात जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद ते लखनौपर्यंत केलेल्या कारवाईत २९०० किलो स्फोटके (संशयित अमोनियम नायट्रेट) जप्त केली होती.
डॉ. उमर अल फलाह मेडीकल कॉलेज फरीबाद येथे नोकरीला होता. डॉ. उमरची आई शमीमा बानू, पुलवामा कोइलची आहे. तो डॉ. अदीलच्या खूप जवळ होता. डॉ. अदीलचा सुद्धा तपास सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उमरचे वडील सरकारी शिक्षक होते. मानसिक दृष्टया स्थिर नसल्यामुळे 10 ते 15 वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली. त्याला दोन भाऊ आणि एक बहिण आहे. एका भावाचे आणि बहिणीचे लग्न झालय. एक भाऊ अविवाहित आहे. दोन्ही भाऊ आणि आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिल्ली पोलिस आणि इतर तपास संस्थांच्या तपासात असे समजले की, उमर हा पार्क केलेल्या i20 कारमध्ये तीन तास बसून राहिला. तो एका मिनिट देखील कारमधून बाहेर पडला नाही. असे म्हटले जात आहे की तो या कारमधून हल्ला कसा करायचा, कधी करायचा आणि कुठे करायचा याबद्दल सूचनांची वाट पाहत थांबला होता.
टेलिग्राम चॅनलद्वारे कट्टरतावादाकडे झुकलेल्या मेडीकल प्रोफेशनल्स ग्रुपचा डॉ. उमर एक भाग बनलेला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. फरीदाबाद मॉड्युल म्हणून याकडे पाहिले जात आहे.
गुन्हा दाखल
या स्फोट प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (UAPA) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी आत्मघातकी हल्ल्याच्या दृष्टिकोनातूनही चौकशी सुरू केली आहे. संपूर्ण घटनेचा प्राथमिक अहवाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




