Tuesday, February 3, 2026
HomeनगरShirdi : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर शिर्डीत सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

Shirdi : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर शिर्डीत सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राजधानी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटाच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात आणि शहरात विशेष काळजी घेतली जात आहे. दिल्लीतील घटनेनंतर राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्रे अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहेत. याचाच भाग म्हणून शिर्डीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

- Advertisement -

साई मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त- मंदिर परिसरात बॉम्ब शोधक पथक, स्थानिक पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान आणि मंदिर सुरक्षा विभागातील कर्मचार्‍यांची संख्या वाढवून विशेष तैनाती करण्यात आली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि दर्शनरांगेत जाणार्‍या प्रत्येक भाविकाची तसेच त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जात आहे. बॅग स्कॅनरचा वापर करून प्रत्येक वस्तूची तपासणी केली जात आहे. शिर्डी शहरात दाखल होणार्‍या भाविकांच्या वाहनांची देखील तपासणी केली जात आहे.

YouTube video player

मंदिर परिसरात जलद कृती दलाला आणि पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वीही साई मंदिराला बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या होत्या, मात्र ताज्या दिल्ली स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणांनी कोणतीही जोखीम न घेता सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केली आहे. साईबाबा संस्थान प्रशासनाने भाविकांना कोणतीही भीती न बाळगता दर्शनासाठी यावे, तसेच सुरक्षा कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या