नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशाची राजधानी दिल्ली काल (10 नोव्हेंबर) स्फोटाने हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये सोमवारी सायंकाळी 6.52 वाजता भयंकर स्फोट झाला. ही कार एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे गेल्याचे तपासात पुढे आले. या स्फोटामध्ये फरीदाबाद येथील डॉक्टर उमर नबीच नाव समोर आले. हेच नाही तर स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही पुढे आले आहे. या स्फोटात आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहे.
दरम्यान, हा स्फोट झाल्यानंतर या स्फोटाचा राष्ट्रीय यंत्रणांकडून तपास सुरु झाला आहे. या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला. ताब्यात घेतलेला डॉ. उमर हा जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. आता या स्फोटाबद्दल खळबळ उडवणारी माहिती पुढे येताना दिसतेय. मोठा कट रचण्यात आला असल्याचे समजत आहे.
मोठ्या घातपाताचा होता प्लॅन
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटात सहभागी असलेल्या फरिदाबाद जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलचे पुरावे गुप्तचर संस्थांना मिळाले असल्याचे समजत आहे. वरिष्ठ गुप्तचर सूत्रांनुसार, हरियाणाची नोंदणी क्रमांक असलेली गाडी उमर मोहम्मदची होती, जो फरिदाबाद-सहारनपूर जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंधित होता. कालच्या छाप्यानंतर, हे व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी स्फोट घडवण्याचा विचार करत होते, परंतु लाल किल्ल्याजवळ चुकून स्फोटचे ट्रिगर दाबल्याने तिकडे स्फोट झाला.
हल्ल्याबाबत मोठ्या घातपाताची योजना असल्याची माहिती आहे. फक्त हेच नाही तर ही गाडी तीन तासांपासून लाल किल्ल्याच्या आसपास फिरत होती. अवघ्या ४ मिनिटात हा स्फोट झाला. दिल्लीमध्ये इतकी कडक सुरक्षा असताना ही गाडी लाल किल्ल्याच्या आसपास कशी पोहोचली, यावर चर्चा सुरू आहे. मोहम्मद उमर हा गाडी चालवत असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्याने तोंडाला काळ्या रंगाचा मास्क लावला आहे.
दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता
दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असल्याची माहिती सांगितली जात आहे. दिल्लीत झालेल्या स्फोटाची तीव्रता अधिक होती. फरीदाबादमधील कारवाईनंतर दिल्लीत स्फोट घडवल्याची तपास यंत्रणांना शंका आहे. त्यामुळे फरीदाबादमधून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. तसेच ३५० किलो स्फोटकेही जप्त करण्यात आलीत.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या या स्फोटात आतापर्यंत १२ जण ठार तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले. या स्फोटात अनेकांचे हात-पाय, शरीराच्या विविध भागांचे अवयव छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याचे समोर आले. स्फोटानंतर आग भडकली व परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




