नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला. तब्बल १४ वर्षांनंतर देशाची राजधानी दिल्ली स्फोटामुळे हादरली. या स्फोटानंतर संपूर्ण देशातील प्रमुख शहरांना अलर्ट देण्यात आला. दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्वच ठिकाणी वाहनांची तपासणी, सीसीटीव्ही तपासले जात आहे. या हल्ल्यात आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा जास्त जण जखमी आहे. या हल्ल्याचे कनेक्शन पाकिस्तानशी जोडले जात आहे. फरिदाबाद टेरर मॉड्यूलशी देखील याचा संबंध जोडला जात आहे. या हल्ल्यानंतर आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
या हल्ल्यात आत्तापर्यंत ३ डॉक्टरांसह ७ संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका महिला डॉक्टरचा ही समावेश आहे. फरीदाबाद या ठिकाणी जैश ए मोहम्मद विंगची हेड डॉ. शाहीना ही जैश ए मोहम्मद च्या महिला विंगची म्हणजेच जमात-उल-मोमिनातची प्रमुख होती. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार शाहीनाला भारतात महिलांना कट्टरपंथी विचारधारांशी जोडण्याची जबाबदारी तिला देण्यात आली होती. फंडिंग, मानसिक स्तरावरचं द्वंद्व, प्रचार या सगळ्या गोष्टींची तिला जबाबदारी देण्यात आली होती असा दावा करण्यात येत आहे.
पाकिस्तानात मसूद अजहरची बहीण सादिया अजहर या सगळ्या गोष्टी बघत होती. सादियाचा पती युसूफ अजहर हा कंदहार हायजॅक प्रकरणाचा मास्टरमाईंड होता. जैश ए मोहम्मद या संघटनेने महिलांच्या धार्मिक जबाबदाऱ्या, जिहादच्या नावे जोडण्याची योजना तयार केली आहे. भारतात डॉक्टर शाहीनासारख्या लोकांवर ही जबाबदारी देण्यात आली होती.
डॉक्टर शाहीनच्या अटकेमुळे मोठा दहशतवादी कट उघड होण्याची शक्यता आहे. शाहीन ही लखनऊची रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या दहशतवादी मॉड्यूलमध्ये तिच्या संशयित भूमिकेसाठी तिला अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या डॉक्टर शाहीनच्या कारमधून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




