नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दाट धुक्यांमुळे मुथरेत यमुना एक्स्प्रेसवेवर थरकाप उडवणारी घटना घडली आहे. सात बस आणि ३ कार अशी दहा वाहने एकमेकांना धडकली. अपघातानंतर वाहनांनी पेट घेतला. बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुना एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. या अपघातात आगीमुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले, या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झालेय.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी भल्या पहाटे प्रवाशी साखरझोपेत असताना ही घटना घडली. ही घटना आग्रा ते नोएडा मार्गावर बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेहरा गावाजवळ माईल स्टोन 127 जवळ घडली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. मदतकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पोहोचवले जात आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, 8 बस आणि 3 लहान कार एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे अनेक प्रवासी वाहनांमध्येच अडकले. तर काही प्रवाशांनी खाली उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, आत अडकलेल्या प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली. अपघातानंतर बसमधून उडी मारून बचावलेल्या कानपूरच्या सौरभने सांगितले की, धुके खूप दाट होते आणि काहीही दिसत नव्हते. त्यामुळे बस एकमेकांवर आदळल्या. अपघात झाल्यावर वाहनांना आग लागली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसेस आग्राकडून नोएडाच्या दिशेने येत होत्या. पहाटेच्या दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडली. सुरुवातीला एका कारची दुसऱ्या कारला धडक बसली आणि त्यानंतर ही धडक मालिका सुरू झाली. एकापाठोपाठ एक गाड्या आदळत गेल्या आणि त्यात एकूण ६ स्लीपर बसेस, एक रोडवेज बस आणि ३ कार्स अडकल्या. टक्कर झाल्यानंतर काही क्षणातच या वाहनांनी पेट घेतला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




