नवी दिल्ली | New Delhi
नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik Trimbakeshwar) येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Nashik Trimbakeshwar Sinhastha Kumbhamela) ध्वजारोहणाची (Flag Hoisting) तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली असतानाच देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि अधिकारी – पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले निमंत्रण दिले आहे.
राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना येत्या ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आयोजित ध्वजारोहण सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण तसेच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेपासून आदिवासी उद्योजकता, वस्त्रकला, कृषिसमृद्धी आणि खाद्यसंस्कृतीपर्यंतच्या वैविध्यपूर्ण वारशाची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संचही प्रदान केला. राष्ट्रपती यांना ध्वजाराहेणाच्याच दिवशी होणाऱ्या गोदा आरती, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित कॉफीटेबल बूक आणि कुंभमेळा टपाल तिकिटाचे अनावरणासाठी देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
या प्रसंगी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे नरसिंहकृपा दास, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आदी यावेळी उपस्थित होते.
कुंभमेळा-महाराष्ट्र संस्कृती दर्शवणारे अनोखे निमंत्रण
राष्ट्रपतींना सादर करण्यात आलेले निमंत्रण वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक संकल्पनेवर आधारित आहे. निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक महात्म्य आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय (पॉप-अप) कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांचा समावेश असलेल्या या संकल्पनेतून नाशिकचा सांस्कृतिक वारसा, पवित्र गोदावरीचा महिमा आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे.




