देवळाली प्रवरा । वार्ताहर
नगर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत देवळाली प्रवरामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) जवानांकडून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काही महिलांना मारहाण झाल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ गंभीर तणाव निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली प्रवरा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असताना, काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा मुसमाडे हे मतदान केंद्राच्या परिसरात होते. यावेळी त्यांच्या खिशाला अधिकृत ओळखपत्र नसल्याच्या कारणावरून पोलीस जवानांशी त्यांचा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने पोलीस जवानांनी मुसमाडे यांच्यासह उपस्थित महिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरताच मुसमाडे समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले, ज्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी सामंजस्याची भूमिका घेतली.
वाढता तणाव पाहता पोलीस आणि निवडणूक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला. अखेर प्रशासनाकडून या प्रकरणाबाबत अधिकृतरीत्या दिलगिरी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाच्या या भूमिकेनंतर आणि सामंजस्याच्या चर्चेनंतर वादावर पडदा पडला असून सध्या शहरातील वातावरण शांत आहे.




