देवळाली प्रवरा|वार्ताहर|Deolali Pravara
देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु असताना दु. 1:50 वाजता निवडणूक आयोगाचा अध्यादेश नगरपरिषदेला प्राप्त झाला. या आदेशानुसार प्रभाग क्र.8 ते 10 प्रभागाचे सर्व पर्यायी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. जे अर्ज छाननी मध्ये वैध ठरविण्यात आले होते. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला व निवडणूक अधिकारी व उमेदवार यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
यामध्ये भाजपा वगळता इतर पक्षांचे पॅनल लगंडे झाल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला असून याबाबत सर्वपक्षीय उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाद मागणार असल्याचे समजते. काल सकाळी 11 वाजता दाखल उमेदवारी अर्जाची छाननी सुरु झाल्यानंतर अधिकृत पक्षाच्या सर्व उमेदवारांचे जोडपत्रातील पर्यायी उमेदवारांचे सर्व अर्ज पात्र ठरविण्यात आले होते. त्यामध्ये प्रभाग क्र.1 ते 7 मधील सर्व पर्यायी उमेदवारांंचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. परंतु दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी निवडणूक आयोगाचा नवीन आदेश प्राप्त झाला.
त्या आदेशानुसार प्रभाग क्र.8 ते 10 मधील सर्व पर्यायी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्या अर्जांची छाननी प्रक्रिया झालेली होती. प्रभाग क्र.1 ते 7 मधील उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व पर्यायी उमेदवारांना बोलावून त्यांना दुपारी 4 वाजल्यानंतर एक पत्र देण्यात आले. त्यानुसार सर्व अधिकृत पक्षाच्या सर्व पर्यायी उमेदवारांची पूर्ण छाननी करण्यात येऊन सर्व पर्यायी उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी अवैध (अपात्र) ठरवले असल्याने या विरुध्द सर्वपक्षीय उमेदवार संभाजीनगर उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. वास्ताविक पाहाता नामनिर्देशन अर्ज भरताना अर्जामध्ये असणार्या त्रुटींबाबत काही उमेदवारांना पत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचा अर्जातील त्रुटी काय आहेत? हे त्यांना अजिबात कळल्या नाही.
जसे की, अर्जावर सही नसणे, सुचकाची सही नसणे, ए.बी फार्मची झेरॉक्स असणे या बाबत कोणत्याही सूचना न देता उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आल्याने ते उमेदवार निर्धास्त राहिले. सकाळी 11 वाजल्यापासून सुरु झालेली उमेदवारी अर्जाची छाननी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु होती. म्हणजे आठ तास ही छाननी सुरु होती. निवडणूक आयोगाच्या आदेशा मध्ये त्रूटीची पूर्तता ही जर छाननीच्या दिवशी केली तर त्याचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात येईल, असा आदेश आहे. परंतु यासाठी संबधीत निवडणूक अधिकार्यांनी कोणत्याही अधिकृत पक्षाचे व उमेदवारांचे काहीही म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे नगरपरिषदेच्या अर्ज दाखल करण्याच्या सभागृहात प्रचंड उडाला. उमेदवार व अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली.
राज्य निवडणूक आयोगाच्या दि.17 नोव्हेंबरच्या निर्देशानुसार प्रथम उमेदवारी अर्जाची छाननीची कार्यवाही करण्यात आली. त्याप्रमाणे छाननी सुरु होती. 1 ते 7 प्रभागा पर्यंत छाननी झाली होती. त्यानंतर काल दि.18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी निवडणूक आयोगाचे पुन्हा सुधारीत निर्देश प्राप्त झाले. त्या प्रमाणे पुन्हा सर्व प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली असल्याचे देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.
ऑनलाईन व ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरण्यामुळे मोठ्याप्रमाणात अर्जात चूका झाल्या असल्याचे उमेदवारांनी सांगितले. आधी ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगितले व नंतर ऑफलाईन अर्ज भरण्यास सांगितले. यामुळे शेवटच्या दिवशी गर्दी झाली आणि काल प्राप्त झालेल्या अध्यादेशानुसार एबी फॉर्मवर पाच सूचक बंधनकारक असल्याने निवडणुकीत नवीन ट्वीस्ट आला असून भाजपा वगळता सर्व पॅनल लंगडे झाले आहेत.




