Monday, May 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजलाच घेणे भोवले; जि.प.उपअभियंता 'एसीबी'च्या जाळ्यात

लाच घेणे भोवले; जि.प.उपअभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

नाशिक। प्रतिनिधी Nashik

सुरगाणा तालुक्यातील दोन गावांचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराकडून २ टक्केप्रमाणे ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरगाणा उपविभागाचा उपअभियंत्याला त्याच्या निवासस्थानी रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुंबई नाका परिसरातील लाचखोराच्या घरी गुरुवारी (दि.९) सायंकाळी ही कारवाई केली.

- Advertisement -

नंदलाल विक्रम सोनवणे (५५) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर उपअभियंत्याचे नाव आहे. सोनवणे हे जिल्हा परिषदेच्या सुरगाणा उपविभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असून तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांना जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांकडून सुरगाणा तालुक्यातील दोन गावांना सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविण्याचे काम देण्यात आले होते.

या कामावर लाचखोर सोनवणे यांना देखरेख करण्याचे अधिकार होते. ठेकेदाराने हे काम विहित वेळेत पूर्ण करून दिले. परंतु त्यांना काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. तक्रारदार यांना हे प्रमाणपत्र देण्याचे मोबदल्यात दोन्ही कामासाठीच्या मंजूर निविदा रक्कम २० लाख रुपयांच्या दाेन टक्केप्रमाणे लाचखोर सोनवणे याने बुधवारी (दि. ८) ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पडताळणी केल्यानंतर गुरुवारी (दि. ९) सापळा रचण्यात आला. लाचखोर सोनवणे याने मुंबई नाका परिसरात असलेल्या त्याच्या निवासस्थानी तक्रारदार यास लाचेची ४० हजारांची रक्कम घेऊन सायंकाळी बोलावले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला आणि सोनवणे याने पंचासमक्ष तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गणेश निंबाळकर, नितीन नेटारे यांनी कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या